Friday, December 3, 2010

तो आणि ती ( तेरा )

प्रेमातले सॉरी-थॅंक्‍यू (तो आणि ती)
मिथिला आणि नचिकेतमधील मोकळ्या संवादातील किंचित अशा विसंवादानं गैरसमजुतीची ढगं तयार झाली. ती अधिक गडद होत गेली. एक दिवस त्या ढगांमधील मरगळ बाहेर आली. बोचरे शब्द कडकडत्या विजांच्या स्वरूपात झेपावले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. चूक कुणाची, या शुल्लक विषयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. दोघांची मनं दुखावली. पण दोघेही पुरते समजूतदार होते. नातं टिकवण्याचं कसब दोघांनी जोपासलं होतं. बघुया पुढे...----मिथिला अगदी मोकळ्या मनानं चूक कबूल करते. नचिकेतला चटकन सॉरी म्हणते. त्याच्या सॉरीची जराही वाट न पाहता. कारण नचिकेत कुणी परका व्यक्ती नसतो. त्याच्यासमोर माघार घेण्यास, आपली चूक कबूल करण्यास मग वेळ का लागावा! तिच्या मनात अहंकाराची बीजे नसतात किंवा मोठेपणाचा बडेजावही नसतो. नातं हे असंच असावं. अगदी थेट हृदयाला जाऊन भिडणारं. आपल्या हातून चूक घडली की नाही हे तपासत बसण्यापेक्षा पुढच्या व्यक्तीच्या अपेक्षांना प्राथमिकता देणारं. तेव्हाच ते काळाच्या कसोटीवर खरं उतरतं. त्यात जीव फुंकला जातो. तसं बघितलं, तर मिथिलाची चूक सॉरी म्हणण्याइतपत मोठी नव्हती. पण नचिकेत कदाचित त्याची अपेक्षा करीत असावा. ती केवळ नचिकेतला चांगलं वाटावं म्हणून सॉरी म्हणते. या सॉरीचा आणि दोघांमधील गैरसमजुतीचा जराही संबंध नसतो. पण नचिकेतचंही कुठेतरी चुकतं. त्यानं वापरलेले बोचरे शब्द आणि स्वतःहून केलेला गैरसमज यावर माफी क्रमप्राप्त आहे. जर मिथिला त्याच्या अपेक्षांवर खरी उतरण्यासाठी माघार घेऊ शकते, तर त्यानं मिथिलाची अपेक्षा नसतानाही माघार घेणं हे मोठेपणाचं लक्षण का ठरू नये...!

""मिथिला माझंच चुकलं. अगं मी रागाच्या भरात बरंच काही बोललो. मी असं करायला नको होतं. अगं माणसांकडून चुका होतात. त्या माणसांनीच समजून घ्यायच्या असतात. आणि आपण तर एकमेकांच्या अगदी जवळ आहोत. आपण एकमेकांना समजून घेणार नाही, तर कोण समजून घेणार. समजूतदारपणा आपल्या नात्याचा श्‍वास आहे, तो बेस आहे. तो मी कसाकाय गमावून बसलो. खरंच माझं चुकलं. सॉरी. एक्‍स्ट्रीमली सॉरी,'' नचिकेतनं माघार घेतली. त्याला थोडा विलंब झाला, पण तो अहंपणावर मात देणारा ठरला.

""अगं अशा आलतू-फालतू विषयांचे आपल्या आयुष्यात इश्‍यू होत गेले, तर नात्याला बळकटी कशी मिळणार. प्रेमात वारंवार एकसारख्या चुका होत गेल्या, तर कुणा एकाचं काही चुकतंय. पण जर एका चुकीवर एवढा गोंधळ झाला, तर त्यात नात्यातील फोलपणा उघड होतो. आपल्या नात्यातील कमकुवतपणाला मी सर्वस्वी जबाबदार आहे. हे मी एक्‍सेप्ट करतो. एक चूक ही नक्कीच अनावधानानं घडली असते. त्याला मागचा पुढचा विचार नसतो. आणि मी वेड्यासारखं ती चूक धरून बसलो. खरंच मिथिला मला माफ कर. माझं चुकलं. तू मला एकदा फोन केला नाही, तर मी भडकणं हे चुकीचच होतं. असं वारंवार घडलं असतं, तर ते तुझ्या निदर्शनास आणून देणं हे माझं काम होतं. आपल्या माणसावर भडकणं हे सर्वथा अनुचित आहे,'' नचिकेत अगदी कळवळून बोलत होता. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तसंच मिथिलाची फार मोठी चूक नसतानाही तिनं चटकन सॉरी म्हणणं अगदी जिव्हारी लागलं होतं.

""इट्‌स ओके नचिकेत. अरे नातं म्हटलं की लहान-मोठे रुसवे-फुगवे आलेच. आपलं तर प्रेमाचं हळवं नातं आहे. प्रेमात एकमेकांकडून फार एक्‍स्पेक्‍टेशन्स असतात. आणि ते पूर्ण झाले नाहीत, की प्रचंड जळफळाट होतो. नात्यात एक्‍स्पेक्‍टेशन्स राहणारच. पण ते पूर्ण झाले नाहीत किंवा त्यानुसार पुढील व्यक्ती वागला नाही की लगेच तणावाचं वातावरण तयार होणं हे बरोबर नाही. ते नात्याला मारक ठरतं. आणि शेवटी समजूतदारपणा म्हणजे नेमकं काय रे... दुसऱ्याला समजून घेणं, अडीअडचणीला त्याची ताकद होऊन त्याच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहणं, त्याची दुःख आपलीशी करणं, आपल्या सुखात त्याला सामील करून घेणं यापेक्षा काही वेगळं नाही. मला तुझ्या सॉरीची अपेक्षा नव्हती. आणि प्रेमात कसलं आलंय, सॉरी आणि थॅंक्‍यू. आपलं नातं त्यापेक्षा मोठं आहे,'' मिथिलानं नकळत प्रेमाची परिभाषा मांडली. मनात असलं की जिभेवर येतं असं जे म्हणतात ते असंच असावं. सॉरीची फॉरमॅलिटी संपल्यावर दोघे कित्येक तास बोलत बसले. एकमेकांसोबत वेळ घालवायला, बोलायला दोघांना हे कारण पुरेसं होतं.

हवाहवासा विकेंड सरून आठवड्याच्या कंटाळवाण्या रूटीनला सुरवात झाली. वेळेवर येणारी कॅब पकडण्यासाठी सकाळी जिवाचा आटापिटा करणं. रात्री जागरण झालं असेल, तर कॅबमध्ये जरावेळ डुलकी काढणं. ऑफिसच्या गेटमधून आत प्रवेश करताना अगदी तुरुंगात जात असल्याचे भाव चेहऱ्यावर आणणं. दिवसभर जीव ओतून राबणं. सोबत चॅटिंग विंडोत विरंगुळा शोधणं. रात्री कॅबमधून घरी येताना पुन्हा एखादी डुलकी किंवा जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींसोबत मोबाईल फोनवर गप्पा किंवा सर्वांत बेस्ट म्हणजे रेडिओवर गाणी ऐकणं. घरी पोहचल्यावर दिवसभराची शिरशिरी अंगात मिरवत बिछ्यान्याला पाठ टेकवणं. आणि झोपण्याआधी विकेंडला किती दिवस शिल्लक राहिलेत, याची चाचपणी करणं. असे दिवसांमागून दिवस अगदी ""सुखात'' जात होते.
एक दिवस कॅबमध्ये मिथिला आणि आशय एकमेकांसोबत बोलत होते. तेव्हा आशयनं सहज विषय काढला. त्याच्या बोलण्यात जरा तणाव जाणवत होता.
""अगं मिथिला, तुला नचिकेतनं ऋतूजाबद्दल काही सांगितलंय का...! ती सध्या प्रचंड तणावाखाली आहे,'' आशयनं विषयाला तोंड फोडलं.

""नाही रे... काय झालंय,'' मिथिलाला माहीत असतानाही ती वेड घेऊन पेडगावला गेली. तिला आशयच्या तोंडून ऐकायचं असतं.

""अगं ऋतूजाचा बॉस तिला प्रचंड त्रास देतोय. तो मुद्दाम तिला जास्त काम देतो. डेडलाईन जवळ आली असेल, असं काम माथी मारतो. मग तिला काम करीत बसावं लागतं. कधी कधी तिला घरी जायला बराच उशीर होतो. तरीही ती काम पूर्ण केल्याशिवाय घरी जात नाही. पण याचं तिच्या बॉसला काहीच वाटत नाही. उलट मी असंही ऐकलंय की ती घरी जायला निघणार एवढ्यात तिचा बॉस अगदी वेळ साधून तिला काम सोपवतो. वेळोवेळी मार्गदर्शन न करता मुद्दाम कामात चुका शोधतो. तिला रागवतो. काही दिवसांपूर्वी तिला दोन दिवस सुट्या हव्या होत्या. तिच्या आतेबहिणीचं लग्न होतं. तर बुवानं त्या मान्य केल्या खऱ्या, पण तिला असं काम सोपवलं की त्याची डेडलाईन अगदी त्या सुट्ट्यांना क्रॉस करणारी होती. शेवटी तिला लग्नाला जायचा निर्णय कॅन्सल करावा लागला,'' आशय अगदी भराभरा सांगत होता.
 
मिथिलाला नचिकेतनं आधीच सगळं सांगितलं होतं. पण ऋतूजाला अतिरिक्त काम दिल्यानं किंवा बॉस त्रास देत असल्यानं आशयला काळजी वाटणं, हे तिला फार सुखावून गेलं. नचिकेतलाही माझी अशीच काळजी वाटेत असेल, तोही माझ्याबद्दल असाच विचार करीत असेल, असा विचार मनात डोकावून गेला. ती मनोमन शहारली. सुखावली. आशयचं बोलणं सुरूच होतं.
(क्रमशः)

No comments: