Friday, October 29, 2010

मुलाला हवी पूर्णवेळ आई.......!!!!

मुलाला हवी पूर्णवेळ आई.......!!!!

साधारणत: पाच वर्षांपर्यंतच्या मुलाला नवीन जगाशी जुळवून घेताना आईची
सोबत असेल तर ताण येत नाही. मात्र, अचानक आईचा सहवास खूप कमी झाला तर
त्याला ताण येऊ शकतो. याचा दुष्परिणाम त्याच्या शारीरिक आणि भावनिक
वाढीवरही होऊ शकतो. आई होणं ही जर स्वतःहून स्वीकारलेली जबाबदारी आहे तर
मग पूर्ण वेळ देऊन जबाबदारी पार पाडणं हे आईचं कर्तव्यच नाही का?

मॅडम, पुढच्या महिन्यापासून मला ऑफिसला येता येणार नाही...''
'"काय?'' पल्लवीचा राजीनामा पाहून गौरी मॅडमना चांगलाच धक्का बसला. अतिशय
हुशार आणि मेहनती पल्लवी लवकरच आई होणार होती. आईपणाचा आनंद पुरेपूर
अनुभवता यावा म्हणून तिने एवढी उत्तम नोकरी हसत हसत सोडली होती. तिचा
आताचा पगार, पोस्ट पाहता एखाद्याचा यावर सहजासहजी विश्‍वास बसणं तसं
अवघडच होतं. पण पल्लवी तिच्या निर्णयावर ठाम होती. आईपण संपूर्णरीत्या
अनुभवणं हे पगार आणि पोस्टपेक्षा तिला लाखपटीनं मोलाचं वाटत होतं.
आणि यात चुकीचं तरी काय होतं? आईपण एन्जॉय करता आलं तर ते चांगलंच आहे
की! माझ्या मते आईपण आणि नोकरी या एका म्यान्यातल्या दोन तलवारीच आहेत,
ज्या एकमेकींना टोचल्याशिवाय एका म्यानात राहूच शकत नाहीत, आणि आईपणाचा
आनंद लुटताना तर नोकरी हा अडसर ठरतो, यात काहीच शंका नाही.

नैसर्गिक जबाबदारीचं भान
आई आणि मुलाचं गर्भावस्थेपासूनच एक जवळचं नातं असतं. कारण तिच्या हृदयाचे
ठोके, तिचा आवाज, तिच्या हालचाली ऐकतच त्याची वाढ झालेली असते.
जन्मानंतरच्या सहवासामुळे त्याचे बंध अधिकच घट्ट होतात. या ओळखीमुळेच
आईच्या सहवासात मुलाला जास्त सुरक्षित वाटतं, त्याची निकोप वाढ होते.
जीवशास्त्रीयदृष्ट्या आई आणि वडिलांचं मुलाशी समान नातं असलं, तरी आईच्या
पोटात मूल वाढत असल्याने नैसर्गिकरीत्याच आईला मूल आणि मुलाला आई जास्त
जवळची वाटते. काही कारणाने आईचा सहवास कमी झाला तर मुलाला असुरक्षित वाटू
लागतं. याबाबत बोलताना मानसोपचारतज्ज्ञ सांगतात, ""आईच्या आधारानेच मूल
इतर जगाशी जुळवून घ्यायला शिकतं. साधारणत: पाच वर्षांपर्यंतच्या मुलाला
नवीन जगाशी जुळवून घेताना आईची सोबत असेल तर ताण येत नाही. मात्र, अचानक
आईचा सहवास खूप कमी झाला तर त्याला ताण येऊ शकतो. याचा दुष्परिणाम
त्याच्या शारीरिक आणि भावनिक वाढीवरही होऊ शकतो.''

शाल्मलीला अमोघच्या, तिच्या मुलाच्या बाबतीत हा मुद्दा प्रकर्षानं
जाणवला. ती एका संस्थेत नृत्याचे वर्ग घेते. तिचा मुलगा अमोघ आठ
महिन्यांचा असताना तिला परदेशातल्या विद्यापीठाकडून नृत्य शिकवण्यासाठी
निमंत्रण आलं. अमोघला घेऊन परदेशात एकटीनं राहणं अवघड होतं. म्हणून
काळजावर दगड ठेवून तिने अमोघला आपल्या आईकडे ठेवून जायचं ठरवलं. आई अचानक
दुरावल्यामुळे अमोघ खूप "डिस्टर्ब' झाला. सारखी आजारपणं सुरू झाली. आजी
ओळखीची होती तरी आईची जाणीव त्याला अस्वस्थ करत होती. शेवटी काही
दिवसांनंतर त्याने आजीलाच आईच्या जागी स्वीकारलं. पुन्हा वर्षभरानंतर
शाल्मली परत आल्यावर तर त्याने तिला ओळखलंही नाही. पुन्हा आईशी नव्याने
ओळख करून घेऊन तिला स्वीकारण्यात जवळपास एक वर्ष गेलं. या सर्व
प्रकारामुळे तो भावनिकदृष्ट्या खूपच कमकुवत झाला. साधारणत: दोन-अडीच
वर्षांपर्यंत मूल "आईशिवाय राहणं' ही कल्पना सहजपणे स्वीकारू शकत नाही.
त्यामुळे अशी वेळ त्याच्यावर वारंवार आणणं हे त्याच्या भावनिक विकासाला
मारक ठरू शकतं. मग करियर आणि पैशावर आपल्या बाळासाठी पाणी सोडावं लागलं
तरी त्यात हरकत काय आहे? आई होणं ही जर स्वतःहून स्वीकारलेली जबाबदारी
आहे, तर मग मुलाला पूर्ण वेळ देऊन जबाबदारी पार पाडणं हे आईचं कर्तव्यच
नाही का?

बाळाला हवा आईचा सहवास
लहान बाळाला आईचा पूर्णवेळ सहवास मिळाला नाही तर काही शारीरिक समस्यांना
सामोरं जावं लागू शकतं. याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख
म्हणाल्या, ""जन्मल्यापासून किमान एक वर्ष तरी बाळाला स्तनपानाची
आवश्‍यकता असते. उत्तम शारीरिक व मानसिक वाढ, तसंच मेंदूच्या वाढीसाठी
स्तनपानाची मदत होते. स्तनपानाअभावी मुलांमध्ये पोटदुखी, वजन न वाढणं,
जंतुसंसर्ग, अशक्तपणा असे आजार उद्‌भवू शकतात. वाढत्या वयाच्या मुलांनाही
वेळच्या वेळी घरचा ताजा व सकस आहार मिळण्याची गरज असते.''

नोकरी करणारी आई घरापासून, मुलापासून किमान आठ ते बारा तास दूर राहणार
असेल तर आईचा सहवास मुलाला कसा मिळणार? शिवाय घरी आल्यावर तीही थकलेली
असते. पुन्हा, मुलाच्या भुकेच्या वेळा गाठता आल्या नाहीत तर त्याचीही
आबाळ होण्याची शक्‍यता असते. त्यानंतर इच्छा असूनही त्याला फिरायला नेणं
किंवा मैदानावर नेण्याइतकी ताकद आणि वेळही तिच्याकडे उरत नाही. त्यातूनही
स्वत:ची ओढाताण करून आयांनी मुलांसाठी या सर्व गोष्टी करायच्या ठरवल्या
तर अतिश्रमांनी काही शारीरिक किंवा मानसिक व्याधीही मागे लागू शकतात.

ऑक्‍युपेशनल थेरपिस्ट असलेल्या डॉ. नीलिमा पाटील यांनी सध्या नोकरी सोडून
मुलांसाठी पूर्णवेळ घरी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्या म्हणतात,
""डिलिव्हरीनंतर सव्वा वर्ष मी नोकरीत ब्रेक घेतला होता. मला दोन जुळी
मुलं आहेत. नंतर जवळजवळ पाच वर्षं मी पार्ट-टाइम नोकरी केली. त्या वेळी
अर्थातच खूप धावपळ होत असे. वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळे
अपॉइंटमेंट्‌सच्या वेळा पाळाव्या लागत. मुलांची आजारपणं, काही दुखलंखुपलं
तरी औषधं देऊन त्यांना क्रशमध्ये सोडताना अगदी जिवावर यायचं. पुन्हा,
मुलांचं खाणंपिणं "हेल्दी' असलं पाहिजे म्हणून ते स्वत:च करायचा आटापिटा
असायचा. या ओढाताणीमुळे मला स्वत:लाही स्पॉंडिलायटिस, हाताला मुंग्या
येणं असे त्रास सुरू झाले.

शिवाय मुलांची आजारपणं, अभ्यास, क्रशला सुटी असेल तेव्हा पर्यायी
व्यवस्था करायचा खूप ताण यायचा. शेवटी मुलं सहा वर्षांची झाल्यावर नोकरी
सोडण्याचा निर्णय घेतला. आता तीन वर्षं आमचं रूटीन खूप छान चाललं आहे.
माझ्या मते छोट्यांचं भावविश्‍वही खूप छोटं असतं. त्यांना क्रशसारख्या
मोठ्या विश्‍वात सोडलं तर ती कुठे तरी हरवून गेल्यासारखी होतात. आज माझा
सहवास मिळाल्यामुळे ती मानसिकदृष्टया खंबीर वाटतात- जे माझ्यासाठी
सर्वांत महत्त्वाचं आहे.'' नोकरी करणाऱ्या आयांच्या बाबतीतली ही
वस्तुस्थितीही आपल्याला नजरेआड करून चालणार नाही.

मुलांच्या वाढीचा आनंद
मूल वाढताना पाहणं ही गोष्टच खूप आनंददायी आहे; पण हे मूल वाढताना
पाहायला आज किती आई-बाबांना वेळ आहे? खरं तर मुलाच्या सहवासावर आईइतकाच
वडिलांचाही हक्क आहे. पण निसर्गाने मात्र यासाठी आईलाच झुकतं माप दिलं
आहे. त्याचा आदर करून किमान आईने तरी मुलाच्या सहवासात राहून त्याच्या
बाललीलांचा आनंद लुटायलाच हवा.

एक-दीड वर्षाचं मूल असो वा चार-पाच वर्षांचं, तासन्‌ तास चालणारी अंघोळ,
क्रिकेटचा खेळ किंवा नुसत्या गप्पा यामध्ये मुलानं वेळेचं भान ठेवावं अशी
अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. अशा वेळी मुलाने ठराविक वेळात खेळणं किंवा
गाणी म्हणणं "आटपून' घ्यावं, अशी आईने अपेक्षा ठेवली तर बऱ्याचदा त्याचा
शेवट दोघांच्याही चिडचिडीत होण्याचा संभवच अधिक. त्यामुळे मुलासाठी आईला
"अमर्यादित' वेळ ठेवावा लागतो हेच खरं. आई आणि मुलाचं जवळचं नातंही
सहवासाचं खतपाणी मिळालं नाही तर कोमेजू लागतं. मुलाच्या छोट्या-मोठ्या
सवयी, विचारपद्धती, संस्कार बदलू शकतात. प्रेम आणि जिव्हाळा आटू शकतो.
काही मुलं आजी-आजोबांचा लळा लावण्याची जास्त शक्‍यता असते. यात वाईट
काहीच नाही. ते त्यांचेच असतात. पण यात मुलाला नैसर्गिकपणे त्याची अशी
"आई" मिळत नाही आणि आईला पूर्णपणे "तिचं असं मूल' सापडत नाही.

"टुगेदरनेस' गरजेचा
लहानपणीच्या चिऊ-काऊच्या गोष्टी असोत की "छोटा भीम'च्या, आईशी बोलत बोलतच
मूल मोठं होतं. सहा-सात वर्षांच्या मुलाला स्वतंत्रपणे मित्र-मैत्रिणींशी
खेळायला आवडतं. त्याचं आईवरचं भावनिक अवलंबित्वही हळूहळू कमी होऊ लागतं;
पण तरीही त्याला आई हवीच असते. जरासं कुठं बिनसलं की स्वारी लगेच आईकडे
पळत येते. अशा वेळी त्याला समजून-समजावून "सोशल' करण्याचा प्रयत्नही
आईलाच करावा लागतो. पुढे टीनएजर्स मुलामुलींना तर आता आपण मोठे झालो
आहोत, सारखी सारखी आई बरोबर नको, असंही वाटायला लागतं. पण मग आई या
मुलांपासून थोडीच सुटी होते? याबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे
म्हणाल्या, ""या काळातही आईने मुलासाठी वेळ राखून ठेवणं आवश्‍यक आहे.
अर्थात यात लहानपणासारखी त्याची कामं करणं, अभ्यास घेणं अभिप्रेत नसून,
जागरूकपणे त्याच्याबरोबर असणं, त्याला सोबत देणं महत्त्वाचं. कधी तरी
फिरायला नेणं, त्याच्या छंदात सहभागी होणं, हेही दोघांच्या नात्यात
मोकळेपणा आणायला मदत करतं.

थोडक्‍यात काय, तर मुलाला त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर आईची गरज
असतेच. ती पूर्ण करणं, मुलाला एक जबाबदार नागरिक घडवणं हे करियर
करण्यासारखीच अतिशय जबाबदारीची आणि काळजीपूर्वक करण्याची गोष्ट आहे. मग
आपणच आपल्या आनंदासाठी जन्माला घातलेल्या मुलाला आईचं प्रेम अनुभवू
द्यायचं, की त्याला आपल्यापासून दूर करून दोघांसाठी तडजोडीचा मार्ग
निवडायचा, याचा विचार प्रत्येकीने करायलाच हवा.

No comments: