Friday, October 29, 2010

नोकरी आणि संगोपनही...........????

नोकरी आणि संगोपनही...........????

मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी आईची गरज असतेच, पण मूल झाल्यानंतर नोकरी
करावी की नाही, हा प्रश्‍न सर्वस्वी तिचा असला पाहिजे. घरच्यांच्या
सपोर्ट सिस्टिमवर तिने तो सोडवला पाहिजे. कारण सर्वच घरी राहणाऱ्या
स्त्रियांची मुले खूप हुशार, सर्वकलागुण संपन्न, निरोगी आहेत, असं काही
चित्र नाही. तेव्हा हा निर्णय पूर्ण विचार करून मुख्यत: आर्थिक कसरत की
जगण्याची कसरत, याचा विचार करून सोडवायचा आहे. म्हणूनच हा परिसंवाद खास
तुमच्यासाठी.

मुलांच्या संगोपनाची जबाबदारी महत्त्वाची असली, तरी आजच्या स्त्रीसाठी
स्वाभिमान, आत्मविश्‍वास आणि स्वविकासही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचा
मुलाच्या विकासावरही चांगला परिणाम होतो. शिवाय आजच्या स्त्रीला विविध
प्रकारे "सपोर्ट सिस्टीम' उपलब्ध असताना तिने संगोपनासाठी पूर्ण वेळ घरी
राहायची गरजच काय?

नेहाची तशी नेहमीच धावपळ चालू असते. पण आज रिक्षावाले काका न आल्याने
मुलांना शाळेत सोडायचं, बॅंकेत जायचं, नोकरीची वेळ गाठायची आणि पुन्हा
मुलं शाळेतून येईपर्यंत घर गाठायचं, हे सगळं करायचं होतं. त्यातच मुलांना
आज संध्याकाळी सर्कस दाखवण्याचा खास कार्यक्रमही ठरवला होता.

तसं हे दिवसभराच्या धावपळीचं गणित आता केवळ एकट्या नेहाचं राहिलेलं नाही,
नोकरी सांभाळून संसार करणाऱ्या सर्वच स्त्रियांचं झालंय. हा सगळा आटापिटा
करणं खरंच आवश्‍यक आहे का? फक्त मुलांचं संगोपन का नाही करायचं? असे अनेक
प्रश्‍न या निमित्ताने उभे राहतात. पण याला उत्तरं शोधायला गेलो तर मात्र
लक्षात येतं, की करियर, संसार आणि संगोपनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणं
सहज शक्‍य आहे.

नोकरीचा आनंद आणि स्वाभिमान
एकविसावं शतक हे ज्ञानाचं शतक आहे. तंत्रज्ञानाचा झपाट्याने होत असलेला
विकास, शिक्षणाची उपलब्धता आणि गरज, पालकांचा पाल्याच्या शिक्षणाबाबत
असलेला सजग दृष्टिकोन आणि वाढत्या महागाईमुळे आर्थिक स्तर उंचावण्याची
चाललेली धडपड, ही या शतकातील या दशकाची वैशिष्ट्यं म्हणावी लागतील. या
वैशिष्ट्यांत मुलीचं-मुलाचं शिक्षण हा भेद नाही. त्यामुळे मुलींचं
पदवी-पदव्युत्तर शिक्षण होत आहे, चांगली नोकरी मिळते आहे, अनुरूप जोडीदार
मिळतो आहे आणि संसार, मुलांचं संगोपन आणि स्वत:चं करियर या तिन्ही गोष्टी
साधता येतात, हे त्या सिद्ध करीत आहेत. हे साधताना अर्थातच थोडी धावपळ,
थोडी गडबड होणार; पण यापेक्षा मिळणारा आनंद आणि स्वाभिमान हा खूप मोठा
असल्याने नोकरी, करियर आणि संगोपन शक्‍य आहे असं माझं मत आहे.

स्त्री जेव्हा लग्नानंतर, विशेषत: मुलांच्या जन्मानंतर नोकरी-करियरचा
विचार करते तेव्हा तो तिचा स्वत:चा निर्णय असतो. (अर्थात याला अपवाद
असतात. परिस्थितीसापेक्षही काही निर्णय घ्यावे लागतात.) हा निर्णय घेताना
तिला स्वत:चं शिक्षण, शिक्षणासाठी आई-वडिलांनी घेतलेली मेहनत, शिक्षणाचा
उपयोग झालाच पाहिजे ही अंत:प्रेरणा, आर्थिक स्वावलंबन आणि समाजातील
प्रतिष्ठा या गोष्टी खुणावत असतात. शिक्षण, आजूबाजूची परिस्थिती, बदलत्या
काळाची गरज लक्षात घेऊन अधिक स्त्रिया या संगोपन आणि करियर दोन्ही उत्तम
सांभाळताना दिसतात. हे सांभाळताना कुटुंब, नातेवाईक, शेजारी, नोकरीच्या
ठिकाणचे सहकारी, अगदी भाजीवाली-पेपरवाल्यापासून अनेकांची दृश्‍य-अदृश्‍य
मदत होत असते. हे सगळे घटक म्हणजे तिची "सपोर्ट सिस्टीम' असते. या
सगळ्यांच्या सहकार्यामुळे आजच्या स्त्रीला हे शक्‍य होत आहे.

मी एका महाविद्यालयात प्राध्यापक असल्यामुळे वेळेची निश्‍चितता ही माझ्या
बाबतीत जमेची बाजू आहे, तसंच मुलांच्या शाळेला सुट्टी तेव्हा मला सुट्टी,
यामुळे संगोपन खूप छान होतं. हे "संगोपन' म्हणजेच जोपासना, पालन-पोषण,
संवर्धन, यथायोग्य सांभाळ होय. मुलाच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेलं
शैक्षणिक, मानसिक आणि भावनिक नातं चांगलं जोपासणं खूप आवश्‍यक असतं. त्या
जोडीला महाविद्यालयात शिकवत असतानाही अनेक गोष्टी समजतात, खूप शिकायला
मिळतं. त्याचा माझ्या व्यक्तिमत्त्वविकासाला आणि मुलाच्या संगोपनातही
उपयोग होतो. घरातील पोषक वातावरणामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत
सहभाग ही आवडही जोपासली जात आहे. उदा. कविसंमेलनाला जाताना मी मुलालाही
माझ्याबरोबर नेते. घरी आल्यावर तो त्यातील कविता काही लकबींसह म्हणून
दाखवतो तेव्हा शब्दांची जादू आणि महत्त्व त्याला समजलंय हे लक्षात येतं.

स्व-विकासासह संगोपन
करियरमुळे होणारे फायदेही प्रत्येक स्त्रीने विचारात घ्यायलाच हवेत.
करियरमुळे आपली दृष्टी, विचारशक्ती अधिक विस्तारते. माणसांची विविध रूपं
पाहायला मिळतात. पुस्तकातले आदर्श आजूबाजूला सापडल्यासारखे होतात.
शिक्षणाचं उपयोजन प्रत्यक्षात आल्यासारखं वाटतं. या सगळ्यामुळे नोकरीचा
ताण वाटत नाही, उलट ओढ वाटते. वि. दा. सावरकर म्हणत, "तुमच्या
क्षमतेपेक्षा कमी काम करणं हा भ्रष्टाचार आहे!' हे वाक्‍य मनात फार रुंजी
घालतं. म्हणून नोकरी, संगोपन आणि स्वत:ची आवडही सांभाळत क्षमता विकसित
करण्याचा प्रयत्न करते आहे. व्यावसायिक क्षेत्रातही आज स्त्रिया धडाडीने
पुढे जात आहेत, स्वत:चे व्यवसाय उत्तम सांभाळत आहेत. नोकरीपेक्षा व्यवसाय
ही खरं तर चोवीस तासांची बांधिलकी असते. अशा वेळी या स्त्रिया संगोपनाला
किती आणि कसा वेळ देत असतील? मुलांना आईची गरज नेहमीच असते. तेव्हा
त्यांच्यातील भावनिक नातं कसं बांधलं जात असेल? घरातील इतर माणसांची
कुचंबणा, चिडचिड होत नसेल का?- असे अनेक प्रश्‍न मनात येतात. या संदर्भात
"अस्पायर कम्युनिकेशन्स"च्या संस्थापक वर्षा मराठे यांच्याशी संवाद
साधला. त्या म्हणाल्या, ""मी पब्लिक रिलेशन्स प्रोफेशनमध्ये करियर करायचं
ठरवलं. हा पूर्णत: माझा निर्णय होता, ज्याला माझा नवरा अमितनं शंभर टक्के
पाठिंबा दिला. पण मला नोकरीत 10-12 तास हरवून बसायचं नव्हतं, तर माझं
आईपणही एन्जॉय करायचं होतं. मुलाचं पालथं पडणं, त्याचा शाळेचा पहिला
दिवस, रिझल्टचा दिवस, मुलानंतर मुलीचं आगमन, सारं सारं एन्जॉय करायचं
होतं. हे नोकरी सांभाळून शक्‍य होईल असं वाटलं नाही म्हणून व्यवसायाकडे
वळले. कामाच्या वेळा "माझ्या' असतील याकडे आवर्जून लक्ष दिलं. मुलं लहान
असताना संगोपनावर जास्त लक्ष केंद्रित केलं; पण हातात कामही ठेवलं आणि
पब्लिक रिलेशन्स वाढवण्यावरही भर दिला. आता मुलांच्या शाळेच्या वेळ
ात मी माझी बाहेरची जास्तीत जास्त कामं पूर्ण करून घेते आणि ती शाळेतून
येण्याच्या वेळात घरी असते.'' आई-वडील, सासू-सासरे, कंपनीतले सहकारी,
घरात कामासाठी ठेवलेल्या बायका, नातेवाइकांचा उत्साह वाढवणारा पाठिंबा
आणि स्वत:ची "रिस्क' घ्यायची तयारी यामुळेच ही कसरत यशस्वीरीत्या पेलता
आल्याचं त्या सांगतात.

मुलांच्या संगोपनाबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, ""संगोपन म्हणजे
प्रत्येक गोष्ट हाताला धरून शिकवणं नाही. माझ्या मते समाजातील चांगल्या
आणि वाईट गोष्टी मुलांना दाखवून देणं महत्त्वाचं आहे. माझ्या
व्यवसायामुळे सामाजिक कार्यक्रमाचे इव्हेंट मी करते तेव्हा अनाथ, पीडित
मुलांना जवळून बघायला मिळतं. एक सामाजिक जबाबदारी म्हणून काही मुलांना मी
माझ्या घरी जेवायला बोलावते तेव्हा माझी मुलं त्यांना जेवायला बसल्यावर
पाणी वाढण्यापासून काम करतात. या मुलांची शालेय फी, पुस्तकं यांचा काही
खर्च आम्ही करतो. हे संस्कार मुलांच्या संगोपनात महत्त्वाचे आहेत. अशा
उपक्रमात तीही सहभागी असल्याने त्यांच्याही मनात विचारचक्र सुरू होतं.
शिवाय आम्ही गच्चीवर भाज्या लावल्या आहेत. त्यांची जोपासना करणं ही
मुलांची जबाबदारी. अर्थात आमचं लक्ष असतंच. यातून आपण रुजवलेली भाजी
नक्की खावीशी वाटते, त्यामुळे त्यासंबंधीची आवड-निवड कमी होते.
झाडांबद्दल जिव्हाळा निर्माण होतो आणि झाडांनाही भाव-भावना असतात हे
प्रत्यक्षात अनुभवता येतं.''

आधार भक्कम सपोर्ट सिस्टीमचा
नोकरी, करियर आणि संगोपन हे सांभाळणं आता फारसं अवघड नाही. घरातील पोषक
वातावरणाबरोबरच "ती'चं स्थान, अस्तित्व यालाही महत्त्व आहे. या तिन्ही
आघाड्या सांभाळताना स्त्रीने घरातली सर्व कामं केली पाहिजेत, हा अट्टहास
राहिलेला नाही. काही कामं करवून घेणं, त्याचा आर्थिक मोबदला देणं म्हणजे
दुसऱ्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करणं, असा विचारही पुढे येतोय. "सुपर
वूमन' होण्यापेक्षा असलेली कामं "सुपर' कशी करता येतील, त्यातून
आपली-कुटुंबाची-समाजाची प्रगती कशी साधता येईल हे पाहिलं जात आहे.
व्यक्तिस्वातंत्र्यावर भर दिला जातोय. शिकलेल्या, चांगल्या पगार असलेल्या
मुलांनासुद्धा नोकरी करणारी बायको पसंत असते. त्यामुळे जमवून घेणं, समजून
घेणं या गोष्टी अपरिहार्य ठरतात. घर, संसार, मुलं ही दोघांची जबाबदारी
असल्यानं संगोपन ही जबाबदारीही वाटली जात असल्याचं दिसतं. लहान मुलांना
अंघोळ घालणारे त्यांचे बाबा पाहिले की माझी आजी म्हणते, ""तुमच्या
आजोबांनी कधी असली कामं केली नाहीत.'' पण आता काळ बदलला. म्हणून स्त्रीला
फक्त घरातल्या कामापेक्षा इतरही करायला सवड मिळू लागली आहे.

मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व महाराष्ट्र
राज्य उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. ज्योती गायकवाड म्हणतात,
""संसारात पती-पत्नीमधील समन्वय आणि समंजसता हे घटक फार महत्त्वाचे आहेत.
मी नोकरी करायची हे निश्‍चित होतं, कारण शैक्षणिक क्षेत्रात आपण काही तरी
करून दाखवू, असा विश्‍वास कुठे तरी मनात होता. स्वत:च्या शिक्षणाचा उपयोग
आपलं करियर, आपण काम करतो ते क्षेत्र आणि मुलांचं संगोपन या तिन्ही
ठिकाणी व्यवस्थित करता येतो असंच मला वाटतं. काम करण्याचा आनंद आणि ते
पूर्णत्वाला गेल्यानंतर त्यातून मिळणारी ऊर्जा तुम्हाला दुसऱ्या कामाकडे
नेते. "काम कामाचा गुरू' हे वाक्‍य मला फार आवडतं.

लहान असताना सासूबाई आणि नंतर पाळणाघर ही माझी भक्कम सपोर्ट सिस्टीम
होती. मुलांशी वेळोवेळी साधलेला आणि साधत असलेला संवाद, आई तुमच्याबरोबर
आहे हे त्यांना जाणवणं, त्यांच्या अडचणी समजून घेऊन दूर करण्याचा प्रयत्न
करणं मला महत्त्वाचं वाटतं. आपण नोकरी केल्यानं मुलं लवकर स्वतंत्र होऊन
स्वत:चं नियोजन स्वत: करतात. अर्थात आपलं लक्ष असतंच. तसंच संगोपन आणि
करियर यामध्ये वेळेचं आणि कामाचं व्यवस्थापनही खूप महत्त्वाचं आहे. ते
साधता आलं तर यश आपलंच असतं.'' आर्थिक मदतीसाठी नोकरी करणं ही गरज
असतानाही या आर्थिकतेचा संबंध सामाजिकतेशी जोडताना डॉ. गायकवाड
म्हणाल्या, ""सध्या शिक्षणाचा खर्च मोठा आहे. आर्थिकतेमुळे मुलांची संधी
जाऊ नये असं वाटतं. आपल्या आर्थिक मिळकतीत आपल्याला मदत करणाऱ्या घरातील
कामवाल्या बाईचाही वाटा आहे, हेही म्हणूनच लक्षात घेतलं पाहिजं.''
एकूणच, स्त्रीला तिची नोकरी, कुटुंब, करियर सगळं सांभाळता येतंय. ते
योग्य रीत्या सांभाळण्याचं गणित तिला जमतंय. हे सर्व करताना तिला मिळणारा
आनंद खूप मोठा आहे. आणि आनंदाला कोणतंही मोल नसतं हेही खरंच, नाही का ?

No comments: