Thursday, October 28, 2010

स्त्रिया! त्यांच्या सोबत रहाणं मुश्किल, त्यांच्या शिवाय तर त्याहुनही मुश्किल!.............

स्त्रिया! त्यांच्या सोबत रहाणं मुश्किल, त्यांच्या शिवाय तर त्याहुनही मुश्किल!.............


(सगळ्या स्त्रिवादी मैत्रिणींची आधिच माफी मागतोय…  उगिच चिडु नका . .. रागाऊ नका.. हा लेख केवळ पुरुषांसाठीच आहे..     आणि कुणालाच दुखवण्याचा हेतु नाही अगदी सहज सुचलं म्हणुन… काहितरी विनोदी लिहायचा प्रयत्न केलाय. कितपत जमला, ते तुम्हीच सांगायचं..)

तुमचं लग्न झालंय़? तुम्हाला गर्ल फ्रेंड आहे? तुम्ही काहिही केले तरी तुमची गर्ल फ्रेंड किंवा बायकॊ तुमच्या चुका काढते? किंवा एखादी गोष्ट केली तर ति गोष्ट दुसऱ्या तर्हेने केली असती तर कित्ती बरं झालं असतं अशी पुस्ती पण जोडते??
काय म्हणता , मी जोतिषी आहे कां? आणि मला कसं कळलं?  सांगतो.. धिर धरा थोडा..
संध्याकळची वेळ असते. तुम्हाला कुठल्यातरी लग्नाला जायचं असतं.. तुमची सौ. छान तयार होऊन बाहेर येते आणि तुमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहाते?  अहो हज्जारो प्रश्न असतात त्या नजरेत पण सगळ्यात महत्वाचा असतो.. ” काय ? कशी दिसते मी?” तुम्हाला पण रोजची तारिफ करुन कंटाळा आलेला असतो, (जर रोज पानात श्रीखंडाची वाटी असेल तर त्या वाटितल्या श्रीखंडाची तारिफ करतो का आपण ? नाही ना, सरळ उचलतो वाटी अन चापतो श्रीखंड!    )मग तुम्ही तिच्या मेकप कडे पाहिलं न पाहिलंसं करता, तसाही -अर्धा पाउण तास मेकप होइ पर्यंत वाट बघुन- कंटाळा आलेला असतो बाहेरच्या सोफ्यावर बसुन वाट बघुन..,  मग  आता काय रोजचंच म्हणुन तुम्ही हं…बाईसाहेब,  चला आता लवकर निघुया आधिच वेळ झालाय, म्हंटलं की मग “तुमचं मेलं आमच्याकडे लक्षंच नसतं हल्ली’ अशी कॉमेंट ऐकायला मिळते… बरं समजा, तुम्ही अगदी लाडात येउन , कित्ती छान दिसतेस गं तु. … असं म्हंटलं तर हट.. खोटारडे कुठले – आणि जास्त लाडात येउ नका लिप्स्टिक खराब होइल.. असं ऐकायला लागतं.. तुम्हीच सांगा.. कसं जगायचं…? पाडगांवकरांना पण हा प्रश्न पडला होताच.
रविवारची संध्याकाळ, तुम्हाला बाहेर जायचंय, सौ. गोदरेजचं कपाट उघडून उभी रहाणार, आणि अगदी ’करिते विश्वाची चिंता’ असा चेहेऱ्यावर भाव आणुन आता कुठली साडी नेसु?  जिन्सच घालु ? की ड्रेस घालू? असा मिलियन डॉलर प्रश्न चेहेऱ्यावर घेउन तुमच्या कडे पहाते. तुम्ही  तिच्या मनातले कळुनही न कळल्या सारखं  दाखवलं. आणि आपला नेहेमिचा एक टी शर्ट कपाटातुन बाहेर ओढता आणी चढवता. तर…. तेवढ्यात………. अहो……. काय  नेसु? असा प्रश्न आला की माझ्या अंगावर काटा येतो. कारण सरळ आहे, उत्तर त्यांना  ‘ जे  काही नेसायचं आहे ‘तेच  हवं असतं .  . तुम्ही म्हंटलं, की ती काळी साडी नेस, तुझ्या गोऱ्या रंगावर छान दिसते, तर नेमकं उत्तर येतं.. मॅचिंग ब्लाउज इस्त्रिला दिलेलं आहे. बरं, तुम्ही सेकंड ऑप्शन दिला की चल, सरळ जिन्सचं घाल आणी चल लवकर.. तर अहो, आपण अम्क्या तम्क्या कडे जातोय ना, तर तिथे जिन्स वाइट दिसेल.. ( मग मला विचारलं कशाला? असा प्रश्न मनात येइल .. पण त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करु नका..)  बरं तुम्ही जरा बोलण सुरु केलं की ती गुलाबी साडी  नेस, तर म्हणेल अहो कित्ती बोलता तुम्ही मला आधिच काही कळत नाहीये, काय घालावं ते, आणि तुम्ही मला कन्फ्युज करताय…  तेंव्हा जरा चाचपडत तिच्या मनाचा अंदाज घेत  उत्तर द्यायचं असतं.. तिची नजर कपाटाच्या कुठल्या कप्प्यावर आहे ते बधुन सांगितलं तर मात्र टॊला लागतॊ कधी तरी. … आणि गप्प बसलं तर.. अहो………. अहो…….. बोला नं ? काय नेसुं??  अता तुम्हीच सांगा…. कसं वागायचं माणसानं?
न्यु इयर ची पार्टी असते तुमच्या मित्र मंडळीची अर्थात विथ फॅमिली. आधिच ठरलं असतं की बरोब्बर १२ वाजता लाइट बंद करणार ३० सेकंदांसाठी.. तर त्या ३० सेकंदांचा ’व्यवस्थित’ उपयोग करुन घ्यायचा प्रयत्न केला  तर म्हणणार..अहो.. हे काय??? कोणि बघेल ना ( आता सगळेच तर त्या ३० सेकंदाचा उपयोग करण्यात गुंतले असतात वेळ कोणाला आहे तुमच्याकडे पहायला?) .. आणि तुम्ही काहिच केलं नाही तर लाइट आल्यावर तुमच्याकडे – काय नेभळट आहे हा अशा नजरेने पहाणार.. थोडापण रोमॅंटिझम शिल्लक नाही तुमच्यात…  तुम्हिच सांगा.. कसं वागायचं पुरुषाने?
बायकोच्या माहेरचं कोणितरी दुरचा मावस भाऊ वगैरे आलेला असतो. तुम्ही ऑफिस मधुन घरी येता… तो समोर दिसतो.. म्हणतो, इंटर्व्ह्यु होता म्हणुन आलोय.. तुम्ही म्हणता… अरे वा.. छान ,,, आता इथेच थांबा.. तर बायकोच्या कपाळावरच्या आठ्या दिसतात आणि जाणवतं.. अरेच्या.. चुकलं वाटतं पुन्हा आपलं…  हा तितकासा जवळचा नाही..  पण  तो पर्यंत बाण सुटला असतो. तुम्ही स्वयंपाक घरात पाणी प्यायला गेल्यावर अहो त्याचे काका रहातात ना इथेच.. तुम्ही इथे कशाला थांबवताय त्याला? असे डायलॉग्ज ऐकावे लागतिल… जर तुम्ही थोडं कोरडं वागलं तर तुम्हाला  मेलं माझ्या माहेरच्याचं कौतुकंच नाही. बोला?? कसं वागायचं माणसाने?
स्तुती ही   स्त्रीला प्रिय असते. मग ती स्तुती तुम्ही केंव्हाही करावी अशी अपेक्षा असते. जर स्तुती केली वेळोवेळी तर मात्र थोडा फार (छॆ! मी वेडा की काय? हे काय लिहितोय? थोडा नाही भरपुर )  फायदा होतो. पण तुम्ही बोलू  लागलात तर गप्प बसा हो..कित्ती बोलता तुम्ही.आधी . आता ऐका की जरा माझं…… आणि तुम्ही न बोलता आपलं बसुन राहिलात तर , अहो, तुम्हाला काय झालंय़? कसला राग आलाय का? आणि तुम्ही सांगितलं की काहि नाही शांत बसलौय सहज तर… काय मुखदुर्बळ माणुस  आहे असं  म्हणणार.. आता तुम्हीच सांगा.. कसं वागायचं?
बरेचदा तुम्ही काही सांगायला गेलं ,तर तिला ते आधीच  माहिती असतं.   तुम्ही एखादी गोष्ट तिला सांगायला जाल, तरी ती तिला नेहेमी माहिती आहे असाच भाव चेहेऱ्यावर असतो.मग तुमचं वाक्य संपता संपता, तिची बॉडी लॅंगवेज पाहिली की मग तुमचा आवाज व्हिस्परिंग टोन ला कन्व्हर्ट होतं, आणि टेपर आउट होऊन थांबतो.
पण… जेंव्हा तिने एखादी गोष्ट सांगायला सुरुवात केली, तर मात्र अगदी भक्ती भावाने आणि पहिल्यांदाच ऐकतो आहे असा भाव चेहेऱ्यावर आणायचा .’तु कित्ती कित्ती हुषार आहेस गं’ असा भाव चेहेऱ्यावर आणायचा,त्या कौतुकाच्या भावाचे रुपांतर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला हव्या असलेल्या भावात ( मुलं समोर नसतिल तर !!   )तुम्ही केल्यास संसार अजुन जास्त सुखाचा होतो ..
आता मी इतकं ओपनली कसं काय लिहु शकतो म्हणताय? अहो माझ्या सौ. ला वेळच नसतो माझं वाचायला. पुरुषांसाठी हा प्रश्न तर गेले  अनेक जनरेशन्स छळतोय..  .” तो म्हणजे ह्या बायकांचं कसं करायचं? त्यांच्या बरोबर जगणं कठीण.. अन त्यांच्या शिवाय जगणं त्याहुन कठीण… “

No comments: