Wednesday, November 17, 2010

*वाइफ की कॉलेज लाइफ*

*वाइफ की कॉलेज लाइफ*
शिक्षण चालू असताना कॉलेज लाईफ, मित्रमंडळी, कॉलेज कट्टा यात रमण्याचा मूड आणि लग्नासारख्या नाजूक विषयाने मनात उमटणाऱ्या भावना, किती भिन्न गोष्टी आहेत या! पण अशा अनेक मुली आहेत ज्या शिकता शिकता या दोन्ही गोष्टी अनुभवत असतात आणि दोन्ही ठिकाणी अगदी वेगळ्या भूमिका पार पाडत असतात.

लेक्‍चर ऑफ असल्यानं एस. वाय. बी. ए.मधली आधीच कमी असणारी मुलं केव्हाच पसार झाली होती आणि मुली गप्पांत मशगूल होत्या. सलग सव्वा तास मोकळा मिळाल्यानं गप्पांचा मस्त फड जमला होता आणि टारगेट होती नुकतंच लग्न ठरलेली सीना जोशी. सायलीनंतर आता सीनाही बोहल्यावर चढत असल्यानं हा ग्रुप भलताच खूश होता आणि जरासा इमोशनलही. दीड वर्ष सॉलिड धम्माल केल्यावर एकेक जण "आपल्या' घरी निघाली होती. बुरा तो लगेगाही. लग्नानंतर सीना पूर्वीसारखीच बिनधास्त, बडबडी राहतेय की सायलीसारखी अबोल, जबाबदाऱ्यांनी वाकलेली आदर्श गृहिणी बनतेय, या विचारानं सगळ्यांच्या दिल की धडकन वाढली होती.

शिक्षण चालू असताना कॉलेज लाईफ, मित्रमंडळी, कॉलेज कट्टा यात रमण्याचा मूड आणि लग्नासारख्या नाजूक विषयाने मनात उमटणाऱ्या भावना, किती भिन्न गोष्टी आहेत या! पण शिकता शिकता लग्न करणाऱ्या मुली या दोन्ही गोष्टी अनुभवत असतात आणि दोन्ही ठिकाणी अगदी वेगळ्या भूमिका पार पाडत असतात. हे नक्कीच चॅलेंजिंग आहे. काही जणी दोन्ही गोष्टींचा उत्तम ताळमेळ घालू शकतात तर काही जणी संसारात रमून जातात आणि शिक्षणाला चक्क पूर्णविराम देतात. म्हणूनच कदाचित सीनाचं लग्न ठरल्याचं कळताच तिचा ग्रुप जरा धास्तावला होता.

सायली एस. वाय.ला जाताच तिच्या लग्नाचे बेत शिजू लागले होते. फर्स्ट टर्मची परीक्षा होताच तिचे हात पिवळे झाले. नवं घर, नवी माणसं, नवी नाती ऍडजस्ट करण्यात ती इतकी गुंतून गेली की आणखी कुठली जबाबदारी नकोच, असं वाटू लागलं. तिच्या मते, लग्न झालं की आयुष्यात किती बदल होतात! अगदी नाव-पत्त्यापासून प्रत्येक गोष्ट बदलते. हा बदल अंगवळणी पडायला थोडा वेळ लागतो. अशातच शिक्षणाचा विषय काढायचा म्हणजे जरा टेंशनच येतं. सासरची मंडळी कसा प्रतिसाद देतील, याची धाकधूक मनात असते. त्यांच्याकडून सहज परवानगी मिळाली तर ठीक, नाही तर जुळत असलेल्या नात्यांत कडवटपणा येऊ शकतो. सायलीच्या सासू-सासऱ्यांनी तर शिक्षणाला विरोधच केला. नवऱ्यानंही फारशी उत्सुकता दाखवली नाही. एव्हाना सायलीचाही उत्साह पार मावळला होता. तिनं एम.ए. करण्याचं स्वप्न सोडूनच दिलं.

रश्‍मीचा अनुभव तर वेगळाच होता. बहिणीच्या लग्नात बहिणीच्या धाकट्या दिरानं तिला पसंत केलं. एकाच मांडवात दोघी बहिणींचा बार उडवून देण्यात आला. ती चांगलीच गोंधळली होती या अचानक बसलेल्या धक्‍क्‍याने. ती म्हणते, ""माझी जराही मानसिक तयारी नव्हती. माझे वडील फार कडक असल्यानं मला होकार देण्याशिवाय काही चॉईस नव्हता. शिक्षण पूर्ण करण्याची मला परवानगी होती तरी मी शिक्षण सोडलं, कारण हा अचानक झालेला बदल पचवणं जरा कठीणच होतं. लग्नानंतरचे सुरवातीचे दिवस फार भुरळ पाडणारे असतात. नवलाईचे हे दिवस संपले की आपण भानावर येतो. मीही या धुंदीत इतकी बुडून गेले होते की माझं अभ्यासात लक्षच लागायचं नाही. त्यामुळे दोन विषयांत केटी लागली. मग तर अभ्यास अगदी नकोसाच वाटायला लागला. करिअरचा विचार तर विस्मरणातच गेला होता. डिग्रीच्या एका कागदासाठी शिकत राहण्यापेक्षा ते सोडलेलं बरं, असा विचार मी केला.''

मनीषाच्या मतेही लग्नानंतर आपण वेगळ्याच कोशात असतो. त्यातून योग्य वेळी बाहेर पडून प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच्या विचारानं मन धडधडतं. थोडी उत्सुकता, थोडी लज्जा आणि खूपशी भीती मनात दाटलेली असते. पहिल्यांदा शारीरिक संबंध आल्यानंतर थोडं डिस्टर्ब व्हायला होतं; पण एकदा त्याची सवय झाली, की ते नातं हवंहवंसं वाटू लागतं. अशा वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्‍यक असतं. नवऱ्याची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. अशा वेळी जर गैरसमज किंवा हेकेखोरपणा झाल्यास निश्‍चितच त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो. पण या बाबतीत त्या दोघांमध्ये सुसंवाद असल्यानं आज ती उत्तमरीत्या सगळं सांभाळते. तरीही, कधी कधी वाटतं तिला, की आई-वडिलांसारखंच नवऱ्यानंही आपल्या अभ्यासात लक्ष घालावं, कॉलेजबद्दल विचारपूस करावी; पण ते तात्पुरतंच. तिच्या मते उलट लवकर लग्न झाल्याचा तिला फायदाच झाला. ती टाईम मॅनेजमेंट शिकली. कुठलीही जबाबदारी कशी पार पाडावी, याचं ट्रेनिंग तिला मिळतंय. तिच्या इतर मैत्रिणींपेक्षा वेगळं काहीतरी ती करतेय आणि त्यातून आपल्याला अधिकाधिक मॅच्युरिटी येतेय, असं तिला वाटतं. म्हणूनच लग्न हे मनीषाचं इन्स्पिरेशन आहे.

अनिताचं लग्नही मनीषासारखंच बारावीनंतर लगेचच झालं. सुरवातीचे दिवस खूप छान गेले. नंतर मात्र तिच्या नवऱ्यानं आपले खरे रंग दाखवायला सुरवात केली. सारखा संशय घेणं, मित्रमैत्रिणींसमोर अपमान करणं, परीक्षेच्या वेळी काहीतरी कारणानं त्रास द्यायचा; पण चांगल्या मार्कांची अपेक्षा ठेवायची, मारझोड करणं, तिची इच्छा असो वा नसो रोज रात्री शरीरसंबंधांसाठी तिला प्रवृत्त करणं...अशा अनेक प्रकारचा त्रास अनिताला सहन करावा लागतो. कितीही त्रास होत असला तरी कॉलेजमध्ये मात्र आनंदी असल्याचा बुरखा ओढावा लागतो. हे तिला सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. तिचं माहेर दिल्लीला असल्यानं आणि माहेरची परिस्थिती बेताची असल्यानं माहेरचा पर्याय उरलाच नाहीये. सासरच्या मंडळींनाही नवरा दाद देत नसल्यानं तो आधारही तुटलाय. नवरा खर्चासाठी पुरेसे पैसेही न देता अनिताला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सक्ती करत असल्याने ते एक वेगळंच टेन्शन तिला सतावतं. तिचे अनुभव तिच्या मैत्रिणींपेक्षा वेगळेच असल्याने ती त्यांच्यासमोरही मन मोकळं करू शकत नाही. कॉलेजमध्ये असूनही अनिताचं कॉलेज लाइफ केव्हाच संपलंय, किंबहुना संपवलं गेलंय.

संपदा एस.वाय.ला असतानाच एका साऊथ इंडियन मुलाशी तिचा प्रेमविवाह झाला. दोन्ही घरून त्यांच्या लग्नाला विरोध असल्यानं ते दिवस फारच तणावपूर्ण होते. ऐन परीक्षेच्या वेळी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. ती बी.एम.एम. करत असल्याने कॉलेजमध्ये बराच वेळ जायचा. तेव्हा ती नोकरीही करत होती. तिचा नवरा बॉडी बिल्डर असल्यानं त्याचं "डाएट' सांभाळावं लागायचं. ते दोघे स्वतंत्र राहत असल्यानं सासरची जबाबदारी अशी काही नव्हती. नवराही समजूतदार होता. तरी सगळं व्यवस्थित सांभाळणं कसरतच होती. तिच्या मते, लग्नानंतर फारशी जबाबदारी वाढली नसली तरी आपलं आता लग्न झालंय ही जाणीवच वेगळी असते. आपण उगाचच प्रौढ व्यक्तीप्रमाणे वागायला लागतो. माहेरच्यांसमोर, मैत्रिणींच्यात अल्लड असलो तरी नवऱ्यासमोर गेल्यावर मोठं झाल्यासारखं वाटतं. आपण जरी शिकत असलो तरी नवरा शिकत नाही, त्यानं ते दिवस कधीच पार केलेत त्यामुळे दोघांच्या मानसिकतेत फरक पडत नाहीये ना, याची जाणीव सतत ठेवावी लागते. तो जर मस्त रोमॅन्टिक मूडमध्ये असेल तर आपला कितीही महत्त्वाचा अभ्यास असला तरी तो बाजूला ठेवावा लागतो. वैवाहिक जीवनातील असे क्षण अनुभवण्याची ओढही खुणावत असते.

संपदा टी.वाय.ला गेल्यावर तिला मुलगी झाली. त्यामुळे तर तिचा बालीशपणा एकदमच संपून गेला. प्रेग्नंट असताना तिला कॉलेजला जावं लागायचं. त्यावरून मैत्रिणींच्यात चर्चा झाल्यास तिला राग यायचा. आपण म्हणजे चर्चेचा विषय होऊ नयेसं वाटतं. संपदाला प्राध्यापकांसमोर जाताना विचित्र वाटायचं. नोकरीप्रमाणे शिक्षणात प्रेग्नन्सी लीव्ह नसल्याने चांगलीच ओढाताण व्हायची. अशा वेळी मानसिक संतुलन राखणं आव्हानच असतं. नंतर मुलगी झाल्यावरही तिचं अर्ध लक्ष घराकडेच लागलेलं असायचं. अशा वेळी मैत्रिणींबरोबर बाहेर जाणं, गप्पा मारत बसणं बंदच होतं जवळजवळ.

मुलीला सांभाळण्याचाही प्रश्न होताच. तिची मुलगी अगदीच लहान होती; पण मुलं जरा मोठी झाल्यावर त्यांना आई घरी आपल्याबरोबर असावी असं वाटतं. घरी जर आजी-आजोबा नसतील तर मुलं फारच एकलकोंडी होतात. मुलांकडे नकळत दुर्लक्ष होऊ शकतं. म्हणूनच लताचा सुरवातीपासूनच तिच्या मुलाला स्वावलंबी बनवण्याकडे कल होता. त्याच्या वयानुसार छोटी छोटी कामं ती त्याला करायला लावायची. आईशिवाय सगळं मॅनेज करायची सवय लहानपणापासूनच लागते. त्यामुळे लताला मुलामुळे घर आणि शिक्षण सांभाळताना कुठलाच त्रास झाला नाही.

प्रत्येकीचे या बाबतीतले अनुभव वेगळे आहेत. काही जणींना दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळता येतात तर काहींना वाटतं जरा घाईच झाली लग्नाच्या बाबतीत. म्हणजेच लग्न मुलींच्या शिक्षणात अडथळा ठरेल की नाही, हे लग्न केव्हा होतंय, यावरही अवलंबून आहे. लग्नाची मानसिक तयारी नसताना किंवा करिअरचं स्वप्न उराशी बाळगलेल्या मुलींना लग्न पायांतली बेडीच वाटत असणार. आपण कुणाबरोबर लग्न करत आहोत हे तितकंच महत्त्वाचं आहे. लग्नापूर्वीचा प्रियकर लग्नानंतर पूर्वीसारखाच वागेल हे सांगता येत नाही. त्याच्याकडून शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी हसत हसत मिळेलच असं नाही, तर कधी कधी ऍरेंज्ड मॅरेज झालेल्या एखादीला शिक्षणासाठी खूप प्रोत्साहन मिळतं.

एक वेळ नोकरी आणि संसार सांभाळण? तितकंसं कठीण नाही, कारण तेव्हा शिक्षण पूर्ण झालेलं असतं. आवश्‍यक ती मॅच्युरिटी आलेली असते. नोकरी करत असताना ठरलेलं काम पार पाडलं की झालं. पण शिक्षणाच्या बाबतीत तसं होत नाही. कॉलेज, परत अभ्यास, परीक्षा अशी यादी जेवढी वाढवू तेवढी वाढतच राहते. त्यातील आपली मानसिक आणि भावनिक गुंतवणूकही वेगळीच असते. जसं सायली म्हणते, ""लग्नामुळे आपल्या बाह्यरूपातही बदल होतो. मग मैत्रिणींबरोबर जात असताना गळ्यात मंगळसूत्र असणाऱ्या एखादीला कुणी लहानग्यानं काकू अशी हाक मारली तरी ऑकवर्ड वाटतं आणि नवऱ्याबरोबर फिरायला गेल्यावर वर्गातला एखादा मुलगा भेटला तर पटकन हाक मारून रस्त्यात बोलत बसावंसं वाटत नाही. सासरचं वातावरण कितीही मोकळं असलं तरी लग्नापूर्वीचा अल्लडपणा नक्कीच थोडा तरी कमी होतो. पूर्वीच्या मनमानी आणि बिनधास्तपणालाही थोडा लगाम बसतो. कुठलाही निर्णय घेताना कुटुंबावर त्याचा काय परिणाम होईल, नवऱ्याचं त्याबद्दल मत काय आहे याचा विचार मनात डोकावतोच, मग ते लव्ह मॅरेज असो वा ऍरेन्ज्ड. एक प्रकारची कमिटमेंट असते लग्न बंधनात.

कुटुंबाचा एक घटक या नात्यानं येणारी जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे संसाराचा डोलारा सांभाळता सांभाळता शिक्षणात सातत्य राखणं शक्‍य भासत असलं तरी दोन्ही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याकडे बघण्याच्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर दोन्ही गोष्टींची सांगड अवलंबून असली तरी व्यवस्थित शिक्षण पूर्ण करून लग्नबंधनात अडकणं केव्हाही सोयीस्कर.''

No comments: