Tuesday, November 16, 2010

तो आणि ती (भाग एक )

'कॅम्पस इंटरव्हू'चा धडाका (तो आणि ती)
 
आर्थिक मंदीचे सावट ओसरल्यावर कॉलेज कॅम्पसमध्ये मल्टिनॅशनल कंपन्यांनी "कॅम्पस इंटरव्हू'साठी अक्षरशः उत्साही धडाका लावला. कॉलेजचे नोटीस बोर्ड विविध कंपन्यांच्या जाहिरातींनी ओसंडून वाहू लागले. कंपन्यांनी आकर्षक पॅकेज ऑफर केले होते. सुवर्णसंधी दारात चालून येत असल्याची अनुभूती होत होती. त्या दोघांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी नावे दिली. त्यांनीही अनुकरण केले. बघू या पुढे काय झाले ते...
दुपारची वेळ. पण, नचिकेतच्या खोलीत रात्रीला साजेसे वातावरण. खिडक्‍यांचे लांबलचक पडदे पाडले असल्याने भिंतींचा रंग अधिक गडद झालेला. तो कॉटवर पालथा निजलेला. केवळ घड्याळ आणि सीलिंग फॅनची तेवढी हालचाल सुरू. तेवढ्यात मोबाईल गुणगुणायला लागला. डोळे किलकिले करून तो मोबाईल शोधायला लागला. टेबलावर... उशीखाली... खिडकीच्या कपारीत... आवाज येतोय खरा. पण, मोबाईल कुठे ठेवलाय हे त्याला झोपेच्या भरात समजत नाही. थोडंसं सावध होऊन त्यानं पुस्तकात ठेवलेला मोबाईल कानाला लावला.

"अरे हॅलो... आहेस कुठे तू... आज कॉलेजला का नाही आलास... आपल्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर पुण्यातल्या दोन मल्टिनॅशनल कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्हूसाठी नोटिसा लागल्या आहेत. तू नोटीस बोर्ड चेक केला होतास का?'' मिथिला अगदी घाईत मोठमोठे उसासे टाकत बोलत होती. तिला थोडी धापही लागली होती. तिने कॉलेजच्या पार्किंगमधूनच नचिकेतला फोन केला होता.

"अगं नाहीना... मी दररोज ठरवतो; पण माझ्याकडून नोटीस बोर्ड चेक करायचे राहूनच जाते आणि आज तर कॉलेजला जायचा जाम कंटाळा आला होता,'' नचिकेत डोळे चोळत म्हणाला.

थोडंसं सावरून तो बोलायला लागला. ""अगं... पण तू खरंच सांगत आहेस ना... नाही म्हणजे माझा तुझ्यावर विश्‍वास नाही, असा मुळीच गैरसमज करून घेऊ नकोस... पण, काही दिवसांआधीच कॅम्पस इंटरव्हूसाठी नोटिसा लागल्या होत्या ना...! आता पुन्हा नोटिसा लागल्या असतील, तर आपल्या बॅचची चांगली चंगळच आहे म्हणायची. थांब वेट कर मी आशय आणि ऋतुजाला कॉन्फरन्स कॉलवर घेतो. तू पप्प्या आणि प्रिंसेसला लाइनवर घे. त्यांनाही ही गुड न्यूज देऊयात,'' नचिकेत उत्साहाच्या भरात झोप गाळून बोलत होता.
त्यांनी ग्रुपच्या सर्वांना कॅम्पस इंटरव्हूची बातमी दिली.

त्या दिवसापासून त्यांनी कॅम्पस इंटरव्हूची कसून तयारी सुरू केली. एकमेकांना ऍप्टीसाठी मदत केली. कॉलेजच्या कॅन्टीनमधील वाफाळणाऱ्या कॉफीसह एकमेकांचे डमी जीडी-पीआय घेतलेत. कुणालाही ही संधी दवडायची नव्हती. त्यांचे रेझूमी आधीच तयार होते. तरीही त्यावर शेवटचा हात मारला. पप्प्यानं तर कॉलम्सची सेटिंग बदलून पाहिली. टेक्‍स थोडा एडिट करून बघितला. शेवटी आहे तोच रेझूमी बरोबर असल्याचे समजल्यावर डावा हात डोक्‍यावर ठेवून "अन डू'चा ऑप्शन वापरला.

"कॅम्पस इंटरव्हू'चे इन्चार्ज असलेल्या सरांना रेझूमी दिल्यावर त्यांनी अगदी परीक्षेचा पेपर सुटल्याच्या आर्विभावात सुटकेचा निःश्‍वास टाकला. एका मोठ्या संकटातून सुटल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. वातावरणातील ताण कमी करण्यासाठी कॅन्टीनला जाऊन गरमागरम वडापाव फस्त केला. त्यांच्या केविलवाण्या चेहऱ्यांकडे बघून सुमार बुद्धी आणि बोजड शरीराचा पप्प्या म्हणाला, ""अरे काय हे चेहरे पडलेले. थांबा तुम्हाला एक मस्त चटपटीत पीजे सांगतो.''

सर्वांनी चेहरे वाकडे केले. मिथिला आणि ऋतुजाने तर कानावर हात ठेवले. पण, त्यांचे ऐकेल तो पप्पू कसला. त्याने जोक सांगायला सुरवात केली.
"हत्ती आणि मुंगी इंटरव्हूला गेलेत. हत्तीचे सिलेक्‍शन झाले. मुंगीचे का झाले नाही...? सांगा...? सांगा पाहू...?''
आशय म्हणाला,"मुंगीने जीडी-पीआयची तयारी केली नसेल.''
"नाही...'' पप्पू लागलीच म्हणाला.
नचिकेत, ""मुंगीने ऍप्टीच क्‍लिअर केले नसेल.''
"बिलकूल नाही...''पप्प्याने उत्तर उडवून लावले.
"मुंगी तुझ्यासारखी माठ असेल...'' ऋतुजाचे उत्तर ऐकून सगळे पोट धरून हसायला लागले.
"ऐ ऋतू... मार देईल हं... अरे सांगा ना उत्तर...'' पप्प्याने अगदी काकुळतीला येऊन विनंती केली.

शेवटी सगळ्यांनी पप्प्याला आग्रह केल्यावर तो म्हणाला, ""मुंगीचा रेझूमीच इंटरव्हूव्हरला वाचता आला नाही. कारण ती आकाराने ऐवढीशी, तर तिचे अक्षरं किती लहान असतील... आणि विशेष म्हणजे इंटरव्हूव्हने जेव्हा प्रश्‍न विचारले तेव्हा तिनं ऋतू आणि मिथीसारखे कानावर हात ठेवले होते. हाऽऽऽ हाऽऽ हाऽऽऽऽ''

पप्प्याचा पीजे ऐकून ऋतुजा आणि मिथिलाच्या चेहऱ्यांवरील हावभाव भराभरा बदलले. संतापाने डोळे लालेलाल झाले. पण तरीही पप्प्याचे संततधार हसणे सुरूच होते. त्याच्या कानाखाली एक द्यावी, असे दोघींच्या मनात येऊन गेले. पण त्याने जराही फरक पडला नसता. निगरगट्ट मनाच्या पप्प्यावर कशाचाच काही परिणाम होत नसे.

पप्प्याचे हसून झाल्यावर सर्वांनी घरचा रस्ता धरला.
शेवटी कॅम्पस इंटरव्हूचा दिवस उजाडला. सर्वांना धाकधूक लागली होती. आत्मविश्‍वास डळमळीत होत होता. कधी नव्हे ते त्यांनी भल्यापहाटे अंघोळी आटोपल्या. देवघरात जाऊन देवाचे नमन केले. नोकरी लागली तर हे करेल..., ते करेल... अशी चार, दोन बेगडी आश्‍वासने सोडली आणि लागलीच सगळे कॉलेजमध्ये जमले.

"अरे तुमची तयारी झाली का... मला तर रात्रभर झोप आली नाही. कुठला अभ्यास करावा तेच सुचत नव्हते. एक प्रश्‍न वाचला, तर दुसरा महत्त्वाचा वाटत होता आणि तो वाचायला गेलो, तर भलताच विचारला जाईल असे वाटत होते,'' पप्प्याने सर्वांच्या मनातली शंका प्रातिनिधिकपणे बोलून दाखविली.
त्यावर आशय म्हणाला, ""बघू रे काय होतंय ते... असे घाबरून थोडीच चालेल. जो डर गया सो मर गया... माहीत आहेना... मग... अरे भीतीवर मात करायला शीक. आपल्या सर्वांना हा इंटरव्हू क्रॅक करायचाच आहे. सर्वांनी अगदी प्रखर आत्मविश्‍वासाने सामोरे जायला हवे.''
"खरे आहे तुझे... सर्वांनी अगदी कॉन्फिडन्ट राहायचे... चला आता वर्गात जाऊ,'' नचिकेतने चर्चेला पूर्णविराम दिला.

त्या कंपनीचे तब्बल पाच एचआर कॉलेजमध्ये आले होते. त्यांनी ऑडिटोरीअममध्ये ऍप्टी घेतली. त्यानंतर ऑडिटोरिअमच्या बाहेर लावलेल्या नोटीस बोर्डवर इलिमिनेशन राउंडमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे लावण्यात आली होती. त्यात त्यांच्या ग्रुपच्या सर्वांची नावे झळकली होती. पण तरीही पप्प्या आणि मिथिलेचे इंग्रजी थोडे कच्चे असल्याने त्यांना कदाचित डच्चू मिळेल, अशी सर्वांना भीती वाटत होती. ग्रुपच्या इतरांनी इंटरव्हूत विचारण्यात येणारे संभाव्य प्रश्‍न आणि उत्तरांचा फावल्या वेळात त्या दोघांकडून सराव करून घेतला.

जीडी-पीआयची अवघड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सगळा ग्रुप कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जमला. त्यांच्या चेहऱ्यावरचा वाढता तणाव अचूक दिसून येत होता. कुणीच कुणाशी फारशे बोलत नव्हते.

प्रिन्सेस वातावरणातील तणाव छेदत म्हणाली, ""बघूयात रे काय होतंय ते... आता उगाच टेन्शन घेऊन काय होईल. आपल्या हातात आता काहीच नाही. यात नाही सिलेक्‍शन झाले, तर दुसरा कॅम्पस इंटरव्हू फेस करू. त्यातही काही नाही झाले, तर डिग्री पूर्ण झाल्यावर पुन्हा प्रयत्न करू. प्रयत्नांती परमेश्‍वर...''
तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव काही निवळत नव्हता. पुण्याची कंपनी असल्याने सिलेक्‍शन झाल्यावर त्यांना पुण्यातच काम करायला मिळणार होते. शिवाय कंपनी मोठी असल्याने पॅकेजही चांगला मिळेल, अशी आशा होती.

थोड्या वेळात नोटीस बोर्डावर नावे लागल्याची बातमी येऊन धडकली. पण, ती नोटीस बघण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती. सगळे एकमेकांकडे बोटं दाखवत होते. नावे बघण्यासाठी एकमेकांना विनवण्या करीत होते. शेवटी प्रिन्सेस उठली. तरातरा कॅन्टीनच्या बाहेर पडली.

पुन्हा सर्वांच्या चेहऱ्यावर तणावाचे सावट पसरले. सगळे अगदी शून्यात बघत होते. त्यांना कशाचीच भ्रांत नव्हती. पप्प्या टेबलावर ठेवलेल्या कॉफीच्या रिकाम्या मगाशी उगाच खेळत होता. नचिकेतने टेबलाला बेड समजून त्यावर मान टाकली होती. डोक्‍याच्या केसांमधून वारंवार हात फिरवून आशय मनाची चलबिचलता व्यक्त करीत होता. तर मिथिला आणि ऋतुजा उगाच रुमालाशी चाळा करीत होत्या.

तेवढ्यात प्रिन्सेस धावत आली आणि कॅडबरीच्या जाहिरातीतील मुलीप्रमाणे अगदी वेडावाकडा डान्स करायला लागली. सगळे जागेवर उभे झाले. प्रिन्सेल य झाले, कुणालाच काही कळेना. शेवटी मिथिला म्हणाली, ""ये... काय लावलं हे... तुझं सिलेक्‍शन झालंय ते कळलंय आम्हाला... पण, आमचं काय झालंय ते सांगणार आहेस की नाही...''

"गेस व्हॉट... गेस... इफ एनिबडी गेस मी, आय विल गिव्ह एक बीग पार्टी... ढॅंणटणॅग... ढॅंणटणॅग...'' कुणालाच काही कळेना प्रिन्सेसला काय सांगायचे आहे ते.

"मूर्खांनो बघताय काय मुजरा करा... मी तुमच्यासाठी सॉलीड न्यूज आणलीय... वुई ऑल गॉट सिलेक्‍डेड... आपल्याला तीनचा पॅकेज मिळालाय... ढॅंणटणॅड... ढॅंणटणॅड...'' प्रिन्सेस कंबर वेडीवाकडी हलवत, चेहऱ्यावर नकळत अगदी अश्‍लील हावभाव आणून सांगत होती.

ही बातमी कानावर पडताच सर्वांनी एकच जल्लोष केला. जोरजोरात शिट्ट्या वाजवल्या. ज्या टेबलावर ताणतणावांचा काळोख पसरला होता त्याभोवती उत्साही घेर करीत ताल धरला. बोजड शरीराचा पप्प्या तर चक्क पाण्याचे कुंड भरलेल्या महिला स्वतःला सांभाळत जशा चालतात, तसे पोटाचे वेटोळे सांभाळत टेबलावर उभा राहून नाचायला लागला. आनंद व्यक्त करून झाल्यावर, एकमेकांना शुभेच्छा देऊन झाल्यावर सर्वांनी घरी फोन करून निवड झाल्याची बातमी आई-वडिलांना दिली. काहींनी काही मोजक्‍या नातलगांनाही आपल्या आनंदात सामावून घेतले. खरंच निवड झाल्याचा आनंद अवर्णनीय होता. सर्वांचाच...
(क्रमशः)

No comments: