Tuesday, November 16, 2010

तो आणि ती (भाग सहा)

प्रेम रंगात रंगूनी... (तो आणि ती)
 
नचिकेतचा प्रेमप्रस्ताव मांडण्याआधीच फेटाळला गेल्यावर त्यानं मिथिलाला बोलकी साद घातली. त्याला वाटलं होतं की भावनाप्रधान मिथिला लागलीच हसत हसत होकार देईल. त्याचा प्रस्ताव क्षणात स्वीकारेल. पण तसं झालं नाही. मिथिलाचं नचिकेतवर प्रेम असलं, तरी जागरूक डोक्‍यानं निपचित पडलेल्या मनाला वेळीच सावध केलं. भविष्यातील धोक्‍याची पूर्वकल्पना दिली. मिथिलानं विचार करायला माफक वेळ मागितला. तसा नचिकेत तणावपूर्ण कोड्यात पडला. सगळ्या घडामोडी अगदी अनपेक्षित होत्या. बघुया पुढं काय झालं ते...
गडद गुलाबी रंगाच्या खोलीत काळोख कोसळलेला. भिंतीवर लटकविलेल्या रहस्यमय चित्रांना अबोल कंठ फुटलेला. घड्याळाचे हात 12 या आकड्यावर स्थिरावलेले. खोलीत अगदी पिन ड्रॉप शांतता. फॅनची घरघर तेवढी स्पष्ट ऐकू येत होती. पेटलेला टेबललॅम्प घनघोर काळोख कमी करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतोय. कसलंसं पुस्तक लॅम्पच्या प्रकाशात छान आराम करीत पाठ-पोट लपवून निपचित पडलेलं. भावहीन चेहरा करून मिथिला पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. पण लक्ष शून्यात. काही वेळानं टेबलावर ठेवलेल्या फ्लॉवर पॉटमधील कृत्रीम गुलांबाकडे नजर वळते. पण तशीच एकटक बघत एका वेगळ्याच विश्‍वास पुन्हा हरवते.

"कधी कधी साधं-सरळ आयुष्य किती कठीण होऊन बसतं नाही... कोणता निर्णय घ्यावा, कसं वागावं, काय बोलावं, तेच समजत नाही... आपण अगदी अशक्‍य अशा कोड्यात रुतून पडतो. असं वाटतं आयुष्य येथे येऊन थांबलंय... थोडंही मूव्ह होत नाहीये... आता आपणच त्याला गतिमान करायचंय... पण कोणत्या दिशेला जायचं... दिशाच गवसत नाही... ओळखीच्या शहरात आपण पुरते अनोळखी होऊन बसतो... माहीत असलेले रस्ते अपरिचित वाटायला लागतात... आपलेसे वाटणारे चेहरे असंबद्ध होऊन जातात... आपल्याला चिडवत राहतात... पण काहीही झालं तरी लाइफ हॅज टू मूव्ह... टाहो फोडणाऱ्या मनाचा उबग येण्याआधी मी निर्णय घ्यायलाच हवा... तो चुकीचा की बरोबर याचा फारसा विचार न करता. आता विचार करायचा तो आपल्या प्रायॉरिटी समोर ठेवून निर्णयाच्या दिशेने आगेकूच करणारा. तेव्हाच प्रयत्नांचं समाधान लाभेल. निर्णय चुकला तरी आपल्या परीनं आपण प्रयत्न केला, याची पावती राहील,'' स्तब्ध-निवांत खोलीत मिथिलाच्या डोळ्यात अशांतता खेळत होती.

"नचिकेत म्हणतोय ते खरंय का...? मुलीनं एखाद्या मुलाचं प्रेम स्वीकारल्यावर तिचे मित्र तिच्यापासून दुरावतात. जिवलग मित्र कायमचे तुटतात... मला तसं काही वाटत नाही. असं कसं काय शक्‍य आहे! प्रेम प्रेमाच्या जागी आणि मैत्री मैत्रीच्या. असं कसं म्हणता येईल...! नचिकेत जाम मूर्ख आहे. त्याचं प्रेम नाकारल्यानं तो पुरता भंजाळलाय. काय खरं, काय खोटं, हेही त्याला समजत नाही. वेडा कुठला...! पण एक मात्र मीही ऑबझर्व्ह केलंय की लग्न झाल्यावर मुलीचे मित्र तिच्यापासून दुरावतात. म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत हे खरं होतं असं नाही... पण बहुतांश मुलींच्या आयुष्यात हे घडतंच. नचिकेतची शंका पुरती रास्त नसली, तरी त्यात थोडी सत्यता नक्कीच आहे,'' विचारमंथन करताना सगळ्याच बाजूंवर पाठ-पोट विचार होत होता.

"पण काही म्हणा... नचिकेत तसा चांगला मुलगा आहे. मला कायम मदत करतो. माझ्यासोबत सगळं शेअर करतो. मला त्याचा मोठा आधार आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट मला तो मनापासून आवडतो. माझं प्रेम आहे त्यावर... त्याचं जरी ऋतूजावर प्रेम असलं, तरी तिनं अप्रत्यक्षपणे नकार दिल्यावर तो माझ्याकडे आला. त्याला एका खऱ्या मैत्रिणीची गरज भासली. आता ऋतुजा एन्गेज झाल्यावर तो आयुष्यभर काही ब्रह्मचारी राहणार नाही. त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी नक्कीच येईल. तो तिच्यासोबत आयुष्य व्यतीत करेल. मग ती मुलगी मी असली तर काय हरकत आहे... तसंच मी आता नचिकेतला नकार दिला, तरीही मला कुणासोबत तरी आयुष्य घालवावंच राहणार आहे. मग तो माझा जिवलग मित्र नचिकेत राहिला तर काय हरकत असेल... होतं असं कधी कधी... आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीचं पहिलं प्रेम कुणीतरी वेगळाच व्यक्ती असतो. मग काय त्या एका गोष्टीमुळे आपण त्याच्याशी असलेलं नातं तोडतो का... त्याच्या प्रेमावर कायम संशय घेतो काय... नाही ना! मग... नचिकेत प्रमाणे मी समजेल की माझंही पहिलं प्रेम मला मिळालं नाही... काय हरकत आहे,'' मिथिलाच्या मनानं सकारात्मक भूमिका घेतली. उगाच कडवट बाबींवर आगपाखड करून आपलं नुकसान करून घेतलं नाही. सकाळचे दोन वाजले होते. डोळ्यांच्या पापण्या जडावल्या होत्या. चेहरा सुकला होता. तिनं नचिकेतला एसएमएस केला. उद्या कॅन्टीनमध्ये भेटण्यासाठी बोलविलं.

नचिकेतला सकाळी 9 वाजता जाग आली. तो आज कॉलेजला जाणार नव्हता. उठल्याबरोबर त्यानं मोबाईल चेक केला. मिथिलाचा एसएमएस बघून त्याच्या चेहऱ्यावर तणाव पसरला. तिनं "हो' म्हटलं असेल की "नाही', अशी घणाघाती शंका मनात उठली. भीतीचा एक अनामिक कंप सर्वांगातून गेला. त्यानं तसाच मोबाईल टेबलावर ठेवला. एसएमएस उघडून बघितला नाही. आधी फ्रेश झाला. देवासमोर हात जोडले. गायत्री मंत्राचा जप करीत एसएमएस बघितला. तर त्यात आज सकाळी 9 वाजता कॅन्टीनमध्ये भेटण्याचा निरोप होता. त्याने उगाच एसएमएस बघायला उशीर केला. चूक लक्षात आल्यावर लागलीच तयार होऊन घराबाहेर पडला.

                                                                                     
  दुसरीकडे कॅन्टीनमध्ये वाट बघून बघून मिथिला पुरती कंटाळली होती. नचिकेतला एसएमएस मिळाला नसावा, असं गृहीत धरून ती कॅन्टीनबाहेर आली. त्याला फोन करावा का, असा विचार मनात डोकावला. पण आपणहून कसा काय फोन करायचा, असंही वाटून गेलं. तेवढ्यात तिचा फोन गुणगुणू लागला. मोबाईल स्क्रीनवर नचिकेतचं नाव नाचत होतं. तिनं फोन उचलला.

"अगं मला आता तुझा एसएमएस मिळाला. प्लीज कॅन्टीनमध्ये थांब थोडी. मी घरून आताशी निघालोय. कॉफी घे थोडी. मी आलोच एवढ्यात. प्लीज थांब थोडी... प्लीज,'' नचिकेत गाडी चालवत मोबाईलवर बोलत असल्यानं मिथिलानं फालतू प्रश्‍न न विचारता केवळ "हो' म्हटलं. तसाही तो अगदी काकुळतीला येऊन बोलत होता. मिथिलानं पुन्हा कॉफी ऑर्डर केली. नचिकेतचं घर कॉलेजपासून लांब असल्यानं त्याला तब्बल अर्धा तास उशीर झाला.

"सॉरी मिथिला... अगं मी आज कॉलेजला येणार नव्हतो. म्हणून जरा निवांत पडलो होतो. तुझा एसएमएस बघायला पण उशीर झाला. कळालंच नाही की तू आज कॅन्टीनमध्ये भेटायला बोलवलं आहेस म्हणून... सॉरी हं... तुला उगाच ताटकळत बसावं लागलं... एक्‍स्ट्रीमली सॉरी,'' नचिकेतनं मिथिलाच्या चेहऱ्यावरचा अवखळ राग ओळखला. मिथिलाला हे कारण अपेक्षित असल्यानं तिनं उगाच भांडण उकरून काढलं नाही.

"हे बघ नचिकेत... मी कधीच घुमवून-फिरवून काही बोलत नाही... तुला माझा स्वभाव माहीत आहे. मी तुझ्या प्रपोजलवर काल खूप खूप विचार केला. (मिथिला हे सांगत असताना नचिकेत अगदी कानात प्राण आणून ऐकत होता. डोळे ताठरले होते.) आधी वाटलं, मी उगाच तुला फसवित आहे. आपली मैत्री असलेलीच बरी. कशाला प्रेमा-बिमात पडायचं. पण नंतर सखोल विचार केल्यावर मनानं साद दिली. आत्मविश्‍वास पुन्हा बळकट झाला. ही रिक्‍स घेण्यासाठी प्रीतीचे बाहु सरसावले... तुझं प्रपोजल मला मान्य आहे. आय लव्ह यू नचिकेत... मला कधीच सोडून जाऊ नकोस. मी तुला खूप खूप प्रेम देईल...'' मिथिलाचं वाक्‍य कानावर पडल्याबरोबर नचिकेतनं आनंदानं उजवी मूठ वळली. आनंद अगदी गगनात मावेनासा झाला. त्याला स्वतःवरच विश्‍वास बसत नव्हता. त्यानं मिथिलाकडून पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली. त्याच्या आनंदात सहभागी होत मिथिलानं पर्समधून गुलाबाचं फूल काढून नचिकेतला दिलं. गुलाबाचा स्पर्श होताच नचिकेत मनोमन शहारला. भावनाप्रधान झाला. डोळ्यांमधून भावना ओसंडून वाहू लागल्या. खऱ्या प्रेमाचा अर्थ गवसला. त्यानं आयुष्यभर साथ निभावण्याचं वचन दिलं.

एवढ्यात मिथिलानं पर्समधून एक गुलाबी रंगाचा कागद काढला. तो नचिकेतच्या हातावर ठेवून वाचायला सांगितलं. प्रारंभी नचिकेतला वाटलं होतं की मिथिलानं त्याला प्रेमपत्र लिहिलं असेल. पण ते तर मिथिलाला उद्देशून होतं. त्यानं तर तिला कधीच असं पत्र-बित्र लिहिलं नव्हतं. मग या पत्राचा जनक होत तरी कोण...?
(क्रमशः)
                                                                                                                                                                                   

No comments: