Tuesday, November 16, 2010

तो आणि ती (भाग नऊ)

कार्पोरेट जगात प्रवेश (तो आणि ती)
कॉलेजच्या आणि त्यानंतर ओघाओघानं युनिव्हर्सिटीच्या परीक्षा आटोपल्या. अभ्यासूवृत्तीचा अक्षरशः कस लागला. अभ्यास एके अभ्यास करीत सगळे शेड्यूलमध्ये आकंठ बुडाले. त्याची परिणती समाधानकारक झाली. चांगले मार्कस पडले. चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागला. कॉलेजचे दिवस असे भर्रकन उडून गेले. काही दिवसांनी कंपनी जॉईन करायची होती. नवीन कंपनीच्या विचारांनी त्यांना पुरतं वेडं केलं. कंपनीत प्रशिक्षण सुरू झालं. कार्पोरेट जगात प्रवेश झाला. हे जग प्रारंभी अतिशय प्रॅक्‍टिकल आणि रुक्ष वाटत होतं. कॉलेजसारखी मोकळीक येथे नव्हती. वातावरणाचा सराव व्हायला काही दिवस गेले. पण त्या सरावानं कॉलेजच्या दिवसांची प्रकर्षानं आठवण यायला लागली. खूप खूप...रात्री 10 ची वेळ. मिथिला जेवण आटपून तिच्या स्वतंत्र खोलीत आली. दार लोटलं. ट्यूबलाईट बंद केला. टेबललॅम्प पेटवला. नचिकेतला एसएमएस टाकला. त्याचं जेवण अजून झालेलं नव्हतं. "थोडी वाट पहा' असा विनंती वजा आदेश येऊन धडकला. तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळला. टाइमपास म्हणून तिनं कसलसं मासिक हातात घेतलं. चाळायचा प्रयत्न केला. कानात आयपॉडच्या वायरी घातल्या. नचिकेतचा फोन आला, तर समजणार नाही म्हणून मोबाईल व्हायब्रेटवर ठेवला. मासिक चाळत असतानाही तिचं लक्ष सारखं मोबाईलच्या स्क्रीनवर लागलं होतं. सेकंदासेकंदाला ती मोबाईलकडे बघत होती. अधीर मनाला समजावत होती. पण आता वाट बघणं जिवावर आलं होतं. मासिकात काही मन रमेना. तिनं ते हातावेगळं केलं. शून्यात बघत विचार करू लागली.

नवीन कंपनी... नवीन नोकरी... या विचारांनी सकाळपासून मिथिलाच्या डोक्‍यात अगदी थैमान घातलं होतं. थोडी भीती पण वाटत होती. आपण कार्पोरेट कल्चरमध्ये ऍडजेस्ट होऊ की नाही, असं सारखं तिच्या मनात येत होतं. पण ग्रुपमधील इतरांची सोबत असल्यानं तेवढाच मनाला आधार होता. एवढ्यात मोबाईल थरथरायला लागला. तिची तंद्री भंगली. तिनं चमकून मोबाईलकडे बघितलं. स्क्रीनवर "नचिकेत कॉलिंग' उमटत होतं. कानातल्या वायरी काढून मोबाईल उचलला. ही त्यांची बोलायची हक्काची वेळ.

""अरे काय हे... किती वेळ लावतोस! कुणी आपली वाट बघतंय, याची काही चिंता आहे की नाही माणसाला...? माझा अगदी पुतळा करून ठेवलाय... जाम कंटाळा आलाय... मी मगापासून तुझी वाट बघत आहे. एकतर एसएमएस करून सांगतो की 10 वाजता कॉलिंग. आणि स्वतःच गायब होतोस. आता नाही हं मी सहन करणार. यापुढे असं काही झालं, तर मी झोपून जाईन. आधीच सांगून ठेवते. समजलं,'' मिथिला असं कितीही म्हणत असली, तरी तिनं तसं कधी केलं नाही. फक्त दम भरायला तेवढा आवडायचा. कारण आता हळवं नातं होतं. हक्क होता.

""अगं सॉरी हं... माझ्या घरी पाहुणे आले होते. त्यानंतर मामेभाऊ येऊन कलमडला. त्यानं साधा एसएमएस पण करू दिला नाही. मोबाईलला हात लावला तर म्हणायचा, महत्त्वाचा फोन करायचा आहे का...? तसं असेल तर सांग...! आता त्याला काय सांगू! आधीच तो आईचा एजंट. त्याला जराही कळालं, तर आईपर्यंत वार्ता गेलीच म्हणून समज. पण तुला फार वाट बघावी लागली नं... सॉरी हं,'' नचिकेतनं स्पष्टीकरण दिलं. ही कदाचित खुलाशाची किमान आठवी ते दहावी वेळ असेल.

""बरं ते जाऊदे... मला ना उद्याची चिंता वाटते. मनाला हुरहूर लागली आहे. असं वाटतं, कसं होईल आपलं. सगळं सुरळीत होईल की नाही. पहिलीच नोकरी असल्यानं, असं होत असेल कदाचित. देवच जाणे उद्या काय होणार आहे ते. बघूया,'' मिथिलानं मनातली शंका बोलून दाखविली.

""काही चुकीचं होणार नाही. सगळं अगदी मजेत पार पडेल. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. आणि तुला काही प्रॉब्लेम आला, तर मला सांग. मी तुला मदत करेल... तसं बघितलं, तर पहिली नोकरी असल्यानं मलाही राहून राहून तोच विचार मनात येतोय. पण तुम्ही सगळे असल्यानं तेवढाच मनाला भक्कम असा आधार आहे. डोण्ट वरी,'' नचिकेतनं मिथिलाची भीती दूर केली. त्यानंतर ते कित्येकवेळ बोलत बसले. दिवसभरातील घडामोडींचा ऊहापोह सुरू होता. परीक्षा सरल्यावरही रात्री बराच वेळ टेबललॅम्प सुरू राहिल्यानं दोघांच्या आयांना शंकांवर शंका फुटायला लागल्या. पण त्या त्यांनी कधी बोलून दाखविल्या नाही. एवढंच.

दुसऱ्या दिवशी सकाळी आशयच्या घरी सगळे जमले. दुपारी बाराचा कंपनीत रिर्पोटींग टाइम होता. घाईगडबड करीत कसेतरी वेळेवर पोहोचले. कंपनीच्या आवारात प्रवेश केल्याबरोबर आखीव-रेखीव रस्ते, हिरवाकंच लॉन, मध्येच एखादी बोलकी आकृती आणि रंगीबेरंगी फुलं अंगाखांद्यावर खेळविणाऱ्या गार्डननं लक्ष वेधून घेतलं. मोठमोठ्या काचेच्या खिडक्‍या असलेल्या उंचच उंच इमारतींनी डोळे दिपावले. पायाखालची चकचकीत फरशी चेहऱ्यांवरचा तुकतुकीतपणा दाखवत होती. आणि पाय घसरणार तर नाहीना, अशी भीती उत्पन्न करीत होती. आपण पुण्यात आहोत, असं अजिबात वाटतच नव्हतं.

एका इमारतीत रिसेप्शनजवळ ते आले. कॉलेजमध्ये आलेल्या एचआरचं रिसेप्शनिस्टला नाव सांगितलं. एचआरनं त्यांना सेमिनार हॉलमध्ये बसायला सांगितलं. एखाद्या फाईव्हस्टार हॉटेलसारख्या त्या सेमिनार हॉलमध्ये ते अगदी अंग चोरून बसले. त्यांना अशा वातावरणाचा सराव नव्हता. सोबत इतरही काही मुले आधीच येऊन बसली होती. त्यांची जवळपास साठ जणांची बॅच होती. थोड्या वेळानं कंपनीचे एचआर मॅनेजर डायसवर आले. त्यांनी सुमारे 20 दिवस चालणाऱ्या ट्रेनिंग सेशनची माहिती दिली. त्यातील पहिले पाच दिवस कंपनीशी संबंधित बाबी, कार्पोरेट एथिक्‍स-मॅनर्स आदी विषयांवर मार्गदर्शन होते. तर उर्वरित दिवस ऑन फिल्ड ट्रेनिंग आणि टेस्ट होत्या. त्या टेस्टमध्ये समाधानकारक प्रगती नसली, तर त्या संबंधित व्यक्तीला नोकरीवरून काढण्याची धमकीसुद्धा देण्यात आली. या धमकीनं अगदी धडकीच भरली. कदाचित आयुष्यातील कार्पोरेट धमकीसत्राला सुरवात झाली होती.

कंपनीच्या पहिल्या दिवशी अखंड लेक्‍चर्सचा भडिमार झाला. पहिला दिवस असल्यानं तेही अगदी स्टुडीअस मुलांप्रमाणे भासवीत होते. लेक्‍चर्स सुरू असताना मध्येच कुठे उठून गेले नाही की आळस वा आळोखे-पिळोखे काढले नाही. पहिला दिवस अगदी बोर गेला. बसून बसून शरीरातील प्रत्येक भागात वेदनेची शिरशिरी चढली. पाठ भयंकर दुखायला लागली. जेवण तेवढं एक मस्त होतं. पप्प्यानं असेच नाही, पाच प्लेट दहिवडी चिरडले.
(क्रमशः) 

No comments: