Tuesday, November 23, 2010

तो आणि ती (भाग बारा)


प्रेमातला समजूतदारपणा (तो आणि ती)

मिथिला आणि नचिकेतचा कॉलेज ग्रुप एकाच कंपनीत नोकरीला होता. पण प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या ग्रुपला दोन भागात विभागण्यात आलं होतं. त्यात मिथिला सोबत आशय, तर इतर सहकारी नचिकेतच्या ग्रुपमध्ये होते. नचिकेतनं मिथिलाच्या ग्रुपमध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आलं नाही. मिथिला आणि आशयचं घरही पुण्यात एकाच परिसरात होतं. त्यामुळे दोघं सोबत ऑफिसला जात असत. यावरून मिथिला आणि नचिकेतच्या संबंधात थोडी ओढाताण झाली. बघूया पुढे काय झालं ते...---
नचिकेत बोलत होता. आणि मिथिला कान देऊन शांत चित्तानं ऐकत होती. मिथिलाला मध्येच बोलता आलं असतं. नचिकेतला टोकता आलं असतं. पण सध्या तिला फक्त ऐकायचंच होतं. त्याशिवाय नचिकेतच्या मनातील मरगळ शब्दांच्या रूपात बाहेर आली नसती. पोट खराब झालं की ते जसं रिकामं करावं लागतं. तसंच नचिकेतच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आधी त्याचं मन रितं करणं गरजेचं होतं. शेवटी नचिकेत थांबला. त्यानं आपल्या शब्दांना आवर घातला. तसं त्याला समजवण्यासाठी मिथिला पुढे सरसावली. ती याच क्षणाची अगदी शांतपणे वाट बघत होती. नचिकेत बोलत असताना त्याच्या बोचऱ्या शब्दांनी दुःखी न होता आपली बाजू अधिक स्पष्टपणे आणि समजेल अशा शब्दात मांडण्यासाठी तिनं मनातल्या मनात तयारी केली होती. आपल्या बाबी तपासून पाहिल्या होत्या. कारण नचिकेतचा गैरसमज मनावर घेऊन तिला आपल्या जिवाचा तिळपापड करायचा नव्हता. तर त्यांच्या संबंधात आलेली मरगळ दूर करायची होती. तेही नचिकेतच्या मनाला ठेच न पोचवता. उद्देश अगदी स्पष्ट होता. कारण कधीकधी बोलण्याच्या नादात तोंडातून पडलेले शब्द आपल्याला अभिप्रेत नसतात. त्यानं विषयाची दिशाच बदलून जाते. आणि मूळ गोष्ट बाजूला राहून लहान-सहान गोष्टींना महत्त्व प्राप्त होतं. गैरसमजुतीचं वादळ शमण्याऐवजी आणखी बलवत्तर होतं. शिवाय नचिकेतच्या समजूतदारपणावर तिचा पूर्ण विश्‍वास होता. फक्त आपली गोष्ट त्याला पटवून देणं ही प्राथमिकता होती. मिथिला बोलती झाली.

""नचिकेत तू समजूतदार आहेस. मला कायम समजून घेतोस. याचा मला अभिमान आहे. तू जराही ब्लॉक माईंडेड नाहीस. तर तू व्यक्तिस्वातंत्र्यावर विश्‍वास ठेवणारा एकविसाव्या शतकातील मॉडरेट मुलगा आहेस. पण गोष्ट जेव्हा माझ्याबाबत असते, तेव्हा तुझा दृष्टिकोन थोडा बदलतो. आधी आपण मित्र असताना इतर मुलांसोबत माझं बोलणं, त्यांच्याशी असलेली मैत्री याबाबत तू कॉन्झरव्हेटिव्ह नव्हतास. पण दोघांमध्ये एक प्रेमाचं नातं तयार झाल्यावर तुझ्या विचारांमध्ये किंचित बदल झाला. हा बदल तू दूर करायला हवास असं मला वाटतं,'' मिथिलानं मूळ मुद्‌द्‌याला हात घातला. ती अगदी समजेल अशा शब्दात आपली बाजू मांडत होती.

""हे बघ नचिकेत आपण सध्या मनानं कितीही एकरूप असलो, तरी जगाच्या दृष्टीनं बघितलं तर अजून आपलं नातं तयार व्हायचंय. आजवर हे नातं आपण अगदी हळुवारपणे जपत आलोय. सध्या नात्याची प्राथमिक अवस्था आहे. जसे जसे दिवस जातील, तशी तशी नात्याला बळकटी मिळेल. आपण एकमेकांना अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकू. पण यासोबतच आपल्यात गैरसमजुतीचे अडथळे निर्माण होणार नाहीत. आपलं मन दूषित होणार नाही. याची आपण काळजी घेतली पाहिजे. नाहीतर आपण नात्याच्या रूपानं पुढे जात असताना मनातली विषण्णता कायम राहील. उद्या आपण आपलं नातं जगाच्या पटलावर ठेवून त्याला समाजाची मान्यता मिळवू. पण मनातली अस्वस्थता कायम राहील. ती आपल्याला मनातल्या मनात टोचत असेल. बोचत असेल. तेव्हा आतापासून आपण स्वतःला प्रिपेअर करायला हवं. मनातल्या शंका-कुशंका दूर करण्यासाठी एकमेकांची मदत घ्यायला हवी. अन्यथा पुढेही नात्यात अडथळे निर्माण होत राहतील. आणि आपला मुक्त संवाद तुटेल,'' मिथिला आज काही थांबणार नव्हती. तिला आपली बाजू पूर्णपणे मांडायची होती.

""नचिकेत मी शिकले. नोकरीला लागले. माझ्या नोकरी करण्यावर तुझा आक्षेप नाही. कारण शिकलेल्या मुलींनी घरी बसून न राहता नोकरी करावी, आपलं करिअर घडवावं, अशा मॉडरेट विचारसरणीचा तू आहेस. पण नोकरी म्हणजे आठवड्यातून पाच-सहा दिवस मान मोडून काम आणि त्यानंतर पगार, असा अर्थ होत नाही. नोकरी करीत असताना माझा इतर पुरुषांशी संबंध येणार. त्यांच्याशी मला व्यवहार ठेवावा लागणार. आमची कदाचित मैत्रीही होऊ शकते. कारण जशा तुला मैत्रिणी आहेत, तसेच मला मित्र राहू शकतात. आणि आहेही... कदाचित माझी नाईटशिफ्ट असली, तर मी रात्री उशिरा घरी येणार. तेव्हा मला समजून घेणारा, माझ्या भावनांना जाणून घेणारा एक व्यक्ती घरी असल्याची भावना तुला व्हावं लागेल. अन्यथा ऑफिसमध्ये तेथील ताणतणाव आणि घरी आल्यावर त्यात आणखी भर मला नकोय. आपल्या बायकोला ऑफिसला जाऊ देणारा नवरा मला नकोय. तर त्यासोबत ऑफिसशी संलग्न बाबी समजून घेणारा नवरा मला हवाय. कारण ऑफिसला जाऊ देणं हा बेगडी समजूतदारपणा झाला. आणि ऑफिसशी संबंधित बाबी समजून घेणं, त्याप्रमाणे वागणं हा खरा समजूतदारपणा आहे. मला वाटतं तुला माझं बोलणं पटलं असेल,'' मिथिलाच्या जिभेचा पट्टा थांबला.
नचिकेत आपली बाजू मांडण्याची आतुरतेनं वाट बघत होता. तो बोलायला लागला.

""मिथिला मी ब्लॉक माईंडेड मुलगा नाही, हे आत्ताच तू मान्य केलंस. कारण माझा तसा स्वभाव नाही, याची तुला पुरेपूर कल्पना आहे. पण मनात गैरसमजुती तयार होऊ नयेत, यासाठी आपल्या वागण्या-बोलण्यात स्पष्टता ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यात थोडी ऍम्बीग्वीटी आली की संबंध ताणली जातात. तू नाईटशिफ्टचा उल्लेख केलास म्हणून तुला सांगतो. नाईटशिफ्ट करायला माझा जराही विरोध नाही. पण किमान तू मला सांगायला तर हवंस की आज नाईटशिफ्ट आहे. रात्री दहा वाजून गेले तरी तू घरी नाही आलीस, तर मी नवरा म्हणून आणि तू बायको म्हणून एकमेकांची चौकशी करणारच ना. कारण तो गैरसमजुतीचा भाग नाही, तर संवादातील विसंवाद आहे. तसंच तू मला न सांगता नाईटशिफ्टला गेलीस आणि परत येताना जर एखाद्या कलीगच्या गाडीवर आलीस, तर मी तुला त्याचं स्पष्टीकरण मागण्याआधी तू ते द्यायला हवंस. कारण ती तुझी जबाबदारी आहे,'' नचिकेत काही हार मानायला तयार नव्हता.

""पण नचिकेत तू मगाशी म्हणालास की तुमच्या दोघांमध्ये मी व्यत्यय आणतो. ही काय बोलायची भाषा झाली. अरे आपल्या व्यक्तीशी बोलताना शब्दांचं तारतम्य बाळगायचं असतं की नाही. मला तुझं बोलणं जराही आवडलं नाही... पण मी तुला दिवसभर फोन केला नाही. हे माझं चुकलं. त्याबद्दल सॉरी. एक्‍स्ट्रीमली सॉरी. मी चित्रं काढण्यात कितीही गुंग झाली असली, तरी तू माझ्या फोनची वाट बघत आहेस, हे मी लक्षात ठेवायला हवं होतं,'' मिथिलानं थोडी नरमाई दाखवून नातं पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. कारण तिला नचिकेतचा स्वभाव ठाऊक होता. केवळ संवादातील विसंवादामुळे दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचा जाणकारपणा तिच्यात होता. पण नचिकेतनं अजून सॉरी म्हटलं नव्हतं...!
(क्रमशः)

प्रेमातला समजूतदारपणा (तो आणि ती)

No comments: