Friday, November 19, 2010

अर्धा मालक ( पुणेरी रिक्षावाला )

अर्धा मालक ( पुणेरी रिक्षावाला )

पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी आता युनिफॉर्म घातलाच पाहिजे, असा धमकीवजा आदेश सरकारकडून प्राप्त झाल्यावर काहींनी स्वखुशीने; तर काहींनी नाराजीने युनिफॉर्मची व्यवस्था केली. युनिफॉर्म घातला नसेल तर त्याला अडवून त्याच्याकडून दंडाची वसुली करण्याचेही कलम त्या अध्यादेशात होते. त्याचप्रमाणे आपले नित्याचे काम सांभाळून पोलिस लागले याही कामाला. रीतसर पावती फाडणे, कोणाचीही अडवणूक नाही, इतके जरी असले तरी आडबाजूने एक अर्धवट युनिफॉर्म असणारा रिक्षावाला पोलिसांची नजर चुकवून चाललाच होता.
चाणाक्ष पोलिसांनं शिट्टी वाजवून त्याला थांबवलं.
"हे काय?''
"कुठं काय? - रिक्षावाला
"युनिफॉर्म कुठं आहे?'' - पोलिस
"हा काय युनिफॉर्मच आहे' - रिक्षावाला
"असला युनिफॉर्म असतो का? एक तर पूर्ण खाकी किंवा पूर्ण पांढरा - माहीत आहे ना?''
"हो पण अडचण अशी आहे की...'' रिक्षावाला घाबरत म्हणाला.
हे ऐकून पोलिसाला जोर आला. तो दमदाटीच्या स्वरात रिक्षावाल्याला म्हणाला - ""मग मघाशी काय म्हणालास युनिफॉर्म आहे म्हणून.
"खाकी पॅंट आणि पांढरा मॅनिला हा असला अर्धवट युनिफॉर्म कसला?'' - पोलिस.
"कसला युनिफॉर्म हवाय माहितेय ना?'' पोलिस
"हो तर!! रिक्षाच्या मालकाचा पूर्ण पांढरा आणि नोकराचा पूर्ण खाकी - रिक्षावाल्याचे उत्तर.
मग? तुझा कसला आहे?
"अर्धा खाकी, अर्धा पांढरा'' - रिक्षावाला.
"मग फाड पावती'' - पोलिस.

"अहो साहेब, ही रिक्षा की नाही, मी माझ्या मालकाकडून विकत घेतो आहे. आता निम्मे पैसे फिटलेत म्हणून निम्मा मालक - म्हणून पांढरी पॅंट, आणि निम्मा नोकर म्हणून खाकी मॅनिला''- एवढं समर्पक उत्तर देऊन रिक्षावाला रिसीट न फाडताच पसार झाला.
उत्तरानं पोलिसांचं समाधान झालं का नाही माहिती नाही. पण कपाळावर हात मारून आजूबाजूच्या पब्लिकसहित तो पोटभर हसला मात्र !.....

No comments: