Wednesday, November 17, 2010

* व्रत वटपौर्णिमेचे *

* व्रत वटपौर्णिमेचे *


ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वटसावित्री व्रत करतात. यंदा हा दिवस बुधवार दि. 18 जून 2008 रोजी येत आहे. मुलीचे लग्न झाल्यानंतर तिने आपले सौभाग्य कायम राहावे म्हणून हे व्रत अवश्‍य पाळले पाहिजे असा दंडक आहे.
सावित्रीचा पती सत्यवान वटवृक्षाच्या झाडाखाली गतप्राण झाला व तो पुन्हा त्याच वडाच्या झाडाखाली जिवंत झाला म्हणूनच त्या झाडाची पूजा करण्याची प्रथा पडली. या दिवशी सर्व सौभाग्यवती स्त्रिया उपवास करून वटसावित्रीचे व्रत करतात. त्यावेळी वडाच्या झाडाची पूजा करतात. शहरात वडाचे झाड नसल्यास वडाची फांदी आणून तिची पूजा करतात, अशा प्रकार सर्व सौभाग्यवती आपापल्यापरीने हे व्रत पूर्ण करतात आणि आपल्या पतीला उदंड आयुष्य मागतात.


वटवृक्षाशी संबंधित सावित्रीची पौराणिक कथा आहे ती अशी.
मद्रदेशाचा राजा अश्वपती याने आपली उपवर कन्या सावित्रीच्या लग्नाची तयारी थाटात केली. सावित्रीने आपणच आपल्या पतीची निवड केली होती. सावित्रीच्या लग्न सोहळ्याने मद्रदेशातील प्रजेला आनंद झाला. राजधानीत सर्वत्र आनंदोत्सव लगीनघाई सुरू झाली. नारदमुनींच्या कानावर ही वार्ता पडताच त्यांची स्वारी मद्रदेशी राजप्रासादात आली. ते सावित्रीला म्हणाले, "बाळ सावित्री, पती म्हणून तू सत्यवानाची निवड केलीस खरी. पण त्याचे वडील द्युमत्सेन हे वृद्ध आणि अंध असून त्यांचे राज्य शत्रूने घेतले आहे. सत्यवानाला आपल्या पित्याबरोबर वनवास प्राप्त झाला आहे. तू त्यांच्याशी लग्न करून वनवासात का राहणार आहेस?''


त्यावर सावित्री म्हणाली, ""मुनीवर केवळ ऐश्वर्यात राहूनच विलास भोगणे मला रुचत नाही. वनवासातील कष्टमय जीवनातच मला खरा आनंद लाभेल. मला सत्यवानच पसंत पडले आहेत.''
""पण सावित्री, तो सत्यवान अल्पायुषी आहे. लग्नानंतर बरोबर एक वर्षाने त्याचा मृत्यू होणार आहे, तेव्हा तू काय ते ठरव,'' नारदमुनी सांगत होते.


पण सावित्रीची निष्ठा अढळ होती. तिचा निश्‍चय पक्का होता. "काहीही असले तरी मी सत्यवानाशीच विवाह करणार,' हा तिचा संकल्प पाहून अश्वपती राजाने सावित्रीचा विवाह सत्यवानाशीच लावून दिला.


सावित्री सासरी अत्यंत साधेपणाने राहात असे. वृद्ध सासुसासरे यांची ती मनोभावे सेवा करी. आपल्या सतत कष्टांनी आणि प्रेमळ वागणुकीने ती सत्यवानालाही अत्यंत प्रिय झाली.
वनवासातील गोड सहवासात वर्षे संपत आले सावित्रीला नारदांच्या त्या भविष्यवाणीची आठवण होतीच तिने खडतर व्रत केले, उपवास केले. रात्रंदिवस परमेश्वराची प्रार्थना केली आणि आपल्या पतीचे मरण टाळावे, त्याचे आयुष्य वाढावे म्हणून तिने सतत उभे राहून परमेश्वराजवळ हट्टच धरला.


एकेदिवशी सत्यवानाबरोबर सावित्रीही वनात गेली. त्या दोघांनी कंदमुळे जमवली. समिधांसाठी लाकडे तोडण्यास सत्यवान वटवृक्षावर चढला. फांदीवर कुऱ्हाड चालवू लागला. पण त्या नादात तो धडकन खाली पडला आणि गतप्राण झाला. सावित्रीने हंबरडा फोडला. ""नाथ मला पण येऊ द्या तुमच्या बरोबर,'' आणि तीही बेशुद्ध पडली. तिच्या आत्म्याला पतीची ती दिव्य प्राणज्योत स्पष्ट दिसत होती. ती साध्वी पतिव्रता होती. व्रतांच्या पुण्याईमुळे तिला ते सर्व दृश्‍य दिसत होते. ती सत्यवानाच्या प्राणज्योतीच्या मागोमाग जाऊ लागली. तेव्हा यमराज म्हणाले, ""बाळे, तुला या सत्यवानाच्या प्राणाबरोबर स्वर्गात येता येणार नाही. मागे फिर आणि त्यांच्या देहाचे अंत्यसंस्कार कर?''


""पण तात, (यमराज) मी पतीशिवाय पृथ्वीवर कशी राहू? मला माझे पती परत द्या म्हणजे मी परत जाते. माझा हा हट्ट आपण पुरवाच!'' असे सावित्री म्हणाली. पतीच्या प्राणासाठी तिने यमराजांकडे खूप आर्जव केले. ते पाहून यमराज म्हणाले, ""मुली, तुझ्या पतीनिष्ठेबद्दल धन्यवाद! पण पतीशिवाय अन्य मागणी माग. मी तो तुझा हट्ट अवश्‍य पुरवीन ''
मग सावित्रीने आपल्या सासऱ्याला दृष्टी मागितली त्यांचे गेलेले राज्य परत मागितले. आपल्या पित्याला पुत्र मागले आणि शेवटी आपणही पुत्रवती व्हावे, असा आशीर्वाद यमाजवळ मागितला.
सावित्रीच्या विनयशील आणि मधुर बोलण्यावर यमराज प्रसन्न झाले. पतीशिवाय तिच्या त्या अन्य मागण्या त्यांनी भराभर कबूल केल्या आणि शेवटी तिला, ""पुत्रवती भव'' असा आशीर्वाद देऊन यमराज फसले. सावित्रीने मोठ्या खुबीने सत्यवानाचे प्राण परत मिळविले. सत्यवान उठला सावित्री शुद्धीवर आली. नंतर दोघे आनंदाने आश्रमात आले.



त्यानंतर सावित्रीने राजधानीतील सर्व सुवासिनी स्त्रियांसह वनातील त्या सौभाग्यदायी वटवृक्षाची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. तिने सुरू केलेली ही प्रथा दर साल ज्येष्ठ पौर्णिमेला सर्वत्र चालू आहे.


सावित्रीचे नाव माहीत नाही, अशी एकही स्त्री सापडणे शक्‍य नाही. पूर्वी पुष्कळ स्त्रिया पतिव्रता म्हणून नावाजलेल्या होत्या. परंतु एकीच्याही नावाने व्रत करण्याची रीत पडली नाही, यावरून सावित्रीची योग्यता सर्व स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे हे उघडच दिसते. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीस नमस्कार केला तर, "जन्म सावित्री हो' असा आशीर्वाद देत असत.


यमाच्या पाशातून पतीला सोडविणाऱ्या सावित्रीने त्याच्या बरोबर विवाह करण्यासाठी सर्व ऐश्वर्य सोडून दिले. पूर्वी पतीला दैवत समजून त्याची सर्व सुखदु:खे सोसण्यास तयार असणाऱ्या, पतीच्या प्रत्येक कार्यास मदत करणाऱ्या व सासुसासऱ्यांना मातापित्यांच्या ठिकाणी मानणाऱ्या स्त्रिया होत्या. त्यामुळे आपला समाज बराच भरभराटीस पोचला होता. परंतु हल्लीच्या काळी याच्या उलट स्थितीमुळे समाजाची अवनती होत चालल्याचे दिसते.

सर्व स्त्री-पुरूषांनी प्रेमाने, नीतीने, सतधर्माने वागले पाहिजे. नुसत्या पूजनाने किंवा उपासाने खरे श्रेय मिळणार नाही. अखंड सौभाग्य प्राप्त होण्याकरिता प्रत्येक आर्य स्त्रीने "सावित्रीव्रत' अवश्‍य करावे.

No comments: