Tuesday, November 16, 2010

तो आणि ती (भाग सात)

फेअरवेलचे फेअर अफेअर! (तो आणि ती)
 
मिथिलानं नचिकेतचं प्रपोजल स्वीकारलं. अगदी मनापासून. मनात किंचितही किंतू-परंतु न ठेवता. नचिकेतचं पहिलं प्रेम ऋतुजा असल्याची तिला कल्पना होती. त्यामुळे प्रारंभी धाडस झालं नाही. मात्र नंतर प्रॅक्‍टिकल विचार केल्यावर आंतरिक साद मिळाली. नचिकेतच्या बाजूनी. मिथिलाच्या होकारानंतर दोघेही खूष दिसत होते. अगदी दोघांचा हळवा अट्टहास पूर्ण झाला होता. दिवास्वप्नं खरी ठरली होती. पण तरीही गुलाबी पत्राचा घोळ कायम होता. फक्त नचिकेतच्याच नव्हे, तर मिथिलाच्याही मनात. बघुया पुढे काय झालं ते...
"अगं मिथिला हे पत्र कुणाचं आहे...? हे तर तुला उद्देशून लिहलेलं दिसतंय. मला काहीच कळालं नाहीये. याचा आता तूच उलगडा कर. उगाच मला पुन्हा कोड्यात ढकलू नकोस. प्लीज हं आता... पुरे झाली चेष्टामस्करी,'' नचिकेत अगदी काकुळतीला येऊन म्हणत होता. त्याच्या चेहऱ्यावरील प्रश्‍नांकीत भाव सहज वाचता येण्याजोगा होता. त्याची झालेली फजिती बघून मिथिला मात्र गालातल्या गालात रहस्यमय हसत होती.

"अरे वेडाच आहेस तू... तुला काय वाटतं मला आशयनं हे पत्र लिहिलं आहे! अरे असं काही नाही रे बाबा... ऐक ना माझं... तुला आज एक गंमत सांगायची म्हणून मी तुला हे पत्र हातात दिलं. आणि ती गंमत सांगण्याआधीच तू प्रश्‍नांचा भडिमार केलास. मला काही बोलू सुद्धा दिलं नाहीस. किती रे तुझा हा आततायीपणा. जरा पेशंस ठेवत जा. मला काही सांगू देत जा...'' मिथिला उगाच रहस्याला आणखी गडद करीत होती.

"मिथिला पुरे हं आता. लवकर सांग मला. उगाच पराचा कावळा करू नकोस. आणि गोष्ट लांबवू पण नकोस. मला माहीत आहे, तुला माझी मस्करी करायला फार आवडतं ते... सांग ना मिथिला, अशी काय करतेस. लहान मुलीसारखी,'' नचिकेतच्या पुन्हा आर्जवी सुरू झाल्या.

"बरं कान देऊन ऐक आता. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. आपण कॅन्टीनमध्ये होतो. तेव्हा माझी बॅग वर्गात होती. बॅगमध्ये केवळ पुस्तकं असल्यानं मी ती कॅन्टीनमध्ये कॅरी केली नाही. पण जेव्हा मी कॅन्टीनमधून वर्गात परत आली तेव्हा गंमत झाली. कुणीतरी हे पत्र माझ्या बॅगमध्ये ठेवलं होतं. त्यात त्या व्यक्तीचं नाव-गाव-वस्तू-प्राणी असं काहीही लिहिलेलं नव्हतं. केवळ प्रेमपत्र मला द्यायचं म्हणून ते बॅगमध्ये ठेवलं होतं. प्रारंभी मला वाटलं की तुम्ही सर्वांनी मिळून माझी मस्करी केली असेल. म्हणून मी मुद्दाम विषय काढला नाही. तुम्ही विषय काढावा म्हणून वाट बघितली. पण त्यानंतर कधीच असा विषय निघाला नाही. म्हणून दिवसेंदिवस विषयाची गुंतागुंत आणखी वाढत गेली. आज तुला ही गोष्ट सांगावी म्हणून तुझ्या हातात पत्र दिलं. तर तुला भलताच संशय आला. तू पण ना पक्का संशयी आहेस,'' मिथिलानं पत्राच्या रहस्याचा गौप्यस्फोट केला. त्यासरशी नचिकेतच्या चेहऱ्यावरचा भाव सरसर बदलला. त्यानं मनातल्या मनात सुटकेचा निःश्‍वास टाकला.

"अगं पण मग... हे पत्र कुणी ठेवलं असेल? जाऊ दे... कुणीतरी खोडी काढलेली दिसते. उगाच कशाला आपल्या डोक्‍यावर भार द्यायचा. आणि मी संशयी वगैरे नाही बरं का... फक्त मला जाणून घ्यायचं होतं तो व्यक्ती आहे तरी कोण... बस ऐवढंच... बाकी काही नाही बरं का...!'' नचिकेतनं चर्चेला पूर्णविराम दिला.
असेच दिवसांमागून दिवस जात होते. दोघांच्या प्रेमाचा सुखकर प्रवास सुरू झाला. सकाळ-संध्याकाळ फोनवर प्रदिर्घ चर्चा चालायची. तरीही कॉलेजला आल्यावर पुनः पुनः बोलावं, एकमेकांसोबत वेळ घालवावा, असं प्रकर्षानं वाटत होतं. कितीही संवाद झाला, तरी वारंवार बोलण्याची सुप्त इच्छा जागृत होत होती. काही दिवसांनी नचिकेत आणि मिथिलानं ग्रुपला त्यांच्या अफेअरची बातमी सांगितली. सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला. त्यांच्या ग्रुपमध्ये आता दोन जोडपी झाली होती. फक्त पप्प्या आणि प्रिन्सेस तेवढे प्रेमप्रकरणांपासून दूर होते. त्यात पप्प्या प्रेमाच्या बाबतीत अगदी कोरडा होता. त्याला कुठलीही मुलगी आवडायची. अगदी काहीही खरेदी करायला गेला की तेथील मुलींवरही बारीक लक्ष ठेवायचा. आणि दुसरीकडे प्रिन्सेसला मुलांना खेळवत ठेवायला फार आवडायचं. तिला अनेक मित्र कम बॉयफ्रेन्ड्‌स होते. पण तरी कधी कुणाला जाणवू दिलं नाही, की तिचं प्रेम आहे कुणावर. यात ती अगदी तरबेज होती. कॉलेजचं अंतिम वर्ष सरत आलं. अगदी हातात धरलेल्या वाळूप्रमाणे. त्याची किंचितही चाहूल लागली नाही.

कंपनीच्या नियमांप्रमाणे शेवटच्या वर्षाला फस्ट क्‍लास मिळणं अत्यावश्‍यक असल्यानं पुन्हा अभ्यास एके अभ्यास सुरू झाला. नोट्‌सची देवाण-घेवाण वाढली. घरातल्या स्वतंत्र खोलीतील टेबलावरची पुस्तकं उघडली जाऊ लागली. टेबललॅम्पचा वापर वाढला. आयुष्यात अभ्यासाचा पुसता शिरकाव झाला. आता दोन कपल्सचं फोनवर बोलणंही बऱ्यापैकी कमी झालं होतं. खासगी जीवनाला अनिच्छेने कात्री लावावी लागली होती. त्यामुळे लाइफमध्ये काही एन्जॉयमेंट राहिली नाही. आयुष्यात अभ्यासाचं साचलेपण आलं. त्यातून सुटका करून घेण्यासाठी ते एखाद्या फेस्टिव्हलची वाट बघत होते. तेवढ्यात ज्युनिअर्सनी फेअरवेलची पार्टी ऑर्गनाईज केल्याची बातमी येऊन धडकली. आणि भर उन्हात चालत असताना रस्त्याच्या कडेला लींबूपाण्याची गाडी दिसावी, अगदी तस्सं समाधान लाभलं.

अखेर फेअरवेलचा दिवस उजाडला. सवयीप्रमाणे आशयनं अगदी सकाळी सकाळीच नचिकेतला फोन केला.
"मग काय म्हणताय साहेब...! कधी येणार दोघे फेअरवेल पार्टीला...! तुमचा काही खास बेत-बीत नाहीना...! पार्टी सायंकाळी 7 वाजता आहे. आम्ही दोघे 6 च्या सुमारास मिथिलाच्या घरी येतो. पप्प्या आणि प्रिन्सेसही तेथेच येणार आहेत...! ठीक आहे मग... भेटू संध्याकाळी. बाय टेक केअर,'' आशयनं लागलीच फोन ठेवला. नचिकेतचा "हो' ओठातच दबून राहिला.

संध्याकाळी सगळे मिथिलाच्या घरी जमले. सर्वांनी छान मॉडर्न आऊटफिट घातले होते. मिथिला आणि ऋतुजा केप्रीत होत्या. तर प्रिन्सेसनं ब्लॅक मिडी घातली होती. आशय, नचिकेत आणि पप्प्या अगदी ठरवून निळी जिन्स आणि स्कीनटाइट टी-शर्टमध्ये आले होते. नोकरी लागल्यावर तिघांनी जीम जॉईन केली होती. त्यामुळे टाइट टी-शर्ट घालणं शक्‍य झालं होतं.

फेअरवेल पार्टीची सुरवात कंटाळवाण्या भाषणांनी आणि वेळखाऊ सत्काराने झाली. अगदी कंटाळा यायला लागला. जांभयांवर जांभया फुटायला लागल्या. सगळे आतुरतेने वाट बघत होते ते डिजेची. शेवटी सत्कार समारंभ आटोपता घेऊन डिजे सुरू करण्यात आला. सगळे टाचा वर करून बेधुंद झाले. पप्प्याला मॅथची मॅडम आवडायची. ती त्यांना फक्त एक वर्ष सिनिअर होती. लेक्‍चर सुरू असताना पप्प्या सारखा तिच्याकडे बघायचा. कधीच तिचं लेक्‍चर बंक करीत नव्हता. त्या दिवशी पप्प्यानं मॅडमला डान्सची ऑफर दिली. मॅडमही तयार झाली. दोघे थिरकायला लागले. यादरम्यान प्रिन्सेलला एक ज्युनिअर मुलानं प्रपोज केलं. तिला त्या मुलाची प्रपोज करण्याची पद्धत आवडली. आणि तिनं लागलीच होकारही कळवला. सगळ्या गोष्टी अनपेक्षित घडल्या. नचिकेत-मिथिला आणि आशय-ऋतुजा अगदी गळ्यात हात टाकून बेधडक नाचत होते. जॉब सिक्‍युरिटी आल्यानं त्यांचीही हिंमत वाढली होतीच. रात्री 12 च्या दरम्यान पार्टी संपली.

फेअरवेलसाठी ज्युनिअर्सचं कौतुक करावं तेवढं कमीच होतं. ज्यांची त्यांनी रग्गड ओळख परेड घेतली होती, त्यांनी सिनिअर्सचा दर्जा घेत कौतुकास्पद कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. अगदी डीजेपासून भांगड्यापर्यंत सोय ठेवली होती. ज्या ज्युनिअर्सला ते अगदी शुल्लक मानत, कधीच काडीचा भाव देत नसत, त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली होती. आज त्यांना आपल्या ज्युनिअर्सचाही अभिमान वाटत होता. फेअरवेलच्या दिवसाचं मनापासून समाधन होतं. पण आता काही दिवसात कॉलेज पुरतं संपेल, याची हुरहूरही मनाला लागली होती. ज्या कॉलेजवर मनापासून प्रेम केलं, ज्या कॉलेजनं जिवलग मित्रांचा ग्रुप दिला, ज्या कॉलेजनं केवळ शिक्षण नव्हे, तर नोकरीही दिली, ज्या कॉलेजनं आयुष्याचा जोडीदार मिळवून दिला, त्याच कॉलेजचा निरोप देताना डोळ्याच्या कडा ओलावल्या. कधीही कोरड्या न होण्यासाठी.
(क्रमशः

No comments: