Tuesday, November 16, 2010

तो आणि ती (भाग चार)

नचिकेतचे प्रपोजचे धाडस (तो आणि ती)
 
मिथिलानं नचिकेतला प्रपोज केलं. मनातील भावना व्यक्त केल्या. पण नचिकेतचं ऋतुजावर प्रेम होतं. त्यानं तसं स्पष्ट सांगितलं. नचिकेतच्या नकारानंतर मिथिलाच्या मनात विषण्णता, उदासीनता, नाउमेद पसरली. नाकारल्या गेल्याचं दुःख सारखं मनाला बोचत होतं. तरीही ती यातून सावरली. नचिकेतला त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी धडपड सुरू केली. कारण नचिकेतच्या आनंदातच तिचा आनंद दडलेला होता. कदाचित यालाच खरं प्रेम म्हणतात... मनापासून केलेलं...
"नचिकेत तू म्हणतोय ते पटतंय मला... पण अरे तू व्यक्त झाल्याशिवाय ऋतुजाला कसं काय कळेल की तू तिच्यावर प्रेम करतोस... तुझ्या भावना कशा काय तिला समजणार... थोडा विचार करना... हे बघ... (नचिकेत मिथिलाकडे बघतो) तू जर "हो-नाही'च्या गुंतागुंतीत अडकून पडलास ना, तर कधीच प्रपोज करू शकणार नाहीस... आणि नंतर तिचं उत्तर तर दूरच राहिलं, किमान भावना व्यक्त केल्याचं समाधानसुद्धा मिळणार नाही. आता तुला धाडस करावंच लागेल...!'' सायंकाळी मिथिलाच्या घराच्या गच्चीवर दोघे गप्पा मारीत बसले होते. नचिकेतनं मिथिलाला नाकारलं असलं, तरी त्याचं प्रेम त्याला मिळवून देण्यासाठी तिची अशक्‍य अशी धडपड सुरू होती. त्याच्या आनंदात सहभागी होऊन तिला आपल्या मनातील दुःख कमी करायचं होतं. प्रपोजसाठी त्याची मनधरणी करणं हे फार बोचरं वाटत असलं, तरी किमान त्याचं प्रेम त्याला मिळवून देण्याचा ध्यास होता.

मिथिला कितीही समजावून सांगत असली, तरी नचिकेतच्या मनातील भीती तसूभरही ओसरत नव्हती. तो अजूनही "हो-नाही'च्या चक्रव्युहात पुरता अडकला होता. ऋतुजा हो म्हणणारच नाही, असं त्यानं गृहीत धरलं होतं. त्यामागचं कारण स्पष्ट होत नसलं, तरी ती "हो' का म्हणेल, याचंही उत्तर काही केल्या सापडत नव्हतं. मनातील भीतीचं सावट क्षणाक्षणाला आणखी गडद होत होतं. एकीकडे त्याची हिंमत कणाकणाने खचत होती, तर दुसरीकडे मिथिला प्रपोजसाठी प्रोत्साहित करीत होती, त्याचं मनोबल वाढवीत होती.

या वेळी तांबडा-पिवळसर सूर्य हळूहळू मावळतीला जात होता. त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. तरीही त्यानं आपलं तेज कायम ठेवलं होतं. जणू दिव्याप्रमाणं विझण्याआधी त्याला एकदा ज्योत चेतवायची होती. जगाला अंधकारातून काही काळासाठी का असेना, पण मुक्ती द्यायची होती. स्वतःला जाळून इतरांची आयुष्ये प्रकाशमान करायची होती. परतफेडीच्या स्वार्थी अपेक्षेचा मनाला किंचितही स्पर्श होऊ न देता! पण मिथिलाचं नचिकेतच्या प्रेमासाठी जळणं आज सूर्यालाही लाजवत होतं. मिथिलाच्या प्रेमाबद्दल त्याला अभिमान आणि तेवढाच आदर वाटत होता. तो आजवर इतरांना केवळ देतच आला असल्याने, त्याला मिथिलाच्या भावनांची, तिच्या सच्चेपणाची पुरेपूर कल्पना होती. मनुष्यप्राण्यातील चढाओढीच्या स्पर्धेतून अलिप्त राहिलेली मिथिलाच त्याला निष्पाप, निर्मळ दिसत होती. आज सायंकाळी एक सूर्य क्षितिजावर, तर दुसरा मिथिलाच्या रूपानं नचिकेतच्या अगदी समोर होता. पण ऋतुजाच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या नचिकेतला यातलं काहीएक दिसत नव्हतं. तिचं जळणं जराही समजत नव्हतं.

शेवटी मिथिलाच्या आग्रहापुढे नचिकेत नमला. ऋतुजाला उद्याच कॉलेजमध्ये प्रपोज करण्याचा बेत आखला. त्याप्रमाणे मिथिला ग्रुपच्या इतरांना कॅन्टीनमध्ये घेऊन जाणार. या वेळी नचिकेतनं लॅब्ररीत काही काम असल्याची बतावणी करायची. ऋतुजाला सोबत येण्याची विनंती करून तेथे थेट प्रपोज करायचं, असं ठरलं होतं. बेत पक्का झाल्यावर मिथिलाचे आभार मानून नचिकेत घरी गेला. ती अद्याप गच्चीवर उभी होती. उद्या तिचं प्रेम कायमचं एका दुसऱ्या व्यक्तीचं होणार होतं. अगदी स्तब्ध होऊन ती शून्यात बघत होती. ती क्षणात विचारचक्रात ओढली गेली.

"खरंच किती कठीण आहे हे... असं आपलं प्रेम दुसऱ्या व्यक्तीच्या स्वाधीन करणं... नचिकेतनं नाही म्हटलं असलं, तरी तो कधीतरी "हो' म्हणेल, अशी आस मनाला लागली होती. पण त्याचं एक दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, असं समजल्यावर आपणच आपल्याला किती काळ फसवत राहायचं... कधीतरी सत्याचा सामना करावाच लागणार होता. उलट त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी मी मैत्रीतील मैत्र जपलं... त्याचा ढळणारा आत्मविश्‍वास पुन्हा जागा केला... त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली,'' मिथिला स्वतःशी बोलत होती.
"पण काहीही म्हणा, उद्या नचिकेतचा प्रपोज माझ्या जिवाला चटका लावून जाणार आहे. मन कितीही ताठर केलं, तरी दुःख होणारच... त्यातून काही सुटका नाही. असो... त्याला बिचाऱ्याला त्याचं प्रेम मिळेल, याचंच काय ते समाधान. शेवटी मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलंय. त्यानंही माझ्यावर प्रेम करावं, अशी काही त्यात अट नव्हती. अटी, शर्थीवर जगणारं माझं प्रेम नव्हतंच मुळी...,'' ती मनाला समजावीत होती.

एवढ्यात तिची नजर उजव्या मनगटावर गेली. घड्याळातील काट्यांमध्ये मॅरेथॉन लागली होती. आज रात्री 8 वाजता त्यांचा ग्रुप कॅम्पात भेटणार होता. प्रिन्सेस आणि ऋतुजाला काही खरेदी करायची होती. त्यानंतर ते एका छानशा हॉटेलमध्ये जेवण करणार होते. मिथिला विचारांच्या प्रलयातून बाहेर पडली.
सगळे जण ठीक 8 वाजता एसजीएस मॉलसमोर जमले. दरवेळीप्रमाणे पप्प्या उशिरा आला. कॅम्पमध्ये भेटण्याचा प्लॅन असल्याने त्याला तयार व्हायला थोडा विलंब झाला म्हणे! असो... प्रिन्सेस आणि ऋतुजाची खरेदी आटोपल्यावर त्यांनी एका छानशा हॉटेलमध्ये जेवण घेतलं. पैसे जरी सध्या आशयने दिले असले, तरी ते टीटीएमएम या पद्धतीनं विभागण्यात आले होते. छान पोट भरून जेवण झाल्यावर एका बंद दुकानाच्या पायऱ्यांवर ते स्थिरावले.

"मित्रांनो मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय... तुम्हाला माहीत आहे, आपण एकमेकांपासून काही लपवीत नाही. सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करतो. त्यामुळे नुकतीच घडलेली ही एक गोष्ट तुमच्या कानावर टाकायची आहे. तसं बघितलं, तर केवळ मलाच नव्हे, तर आम्हाला तुम्हाला काही सांगायचंय...'' आशयच्या बोलण्यानं रहस्यमय शांतता कोसळली. सगळे कोड्यात पडले. आशयच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागत नव्हता.

"अरे यार प्लीज... आता सांगना लवकर... कशाला आमच्या पेशंसची परीक्षा घेतोस. एवढं काय कोड्यात बोलतोस..., अगदी अकबराच्या दरबारातील खोळसट बिरबलासारखा! सांगना लवकर...,'' पप्प्यानं सर्वांच्या वतीनं आग्रह केला.

"मित्रांनो कान उघडे ठेवून ऐका... आय ऍम एन्गेज नाऊ! मी काल ऋतुजाला प्रपोज केलं. तिनं आज माझं प्रपोज एक्‍सेप्ट केलंय. आज आमच्यासाठी फार मोठा दिवस आहे. म्हणूनच मी मगाशी कुणाकडून जेवणाचे पैसे घेतले नाहीत...'' आशयनं एका श्‍वासात सगळं सांगून टाकलं.

हे ऐकल्यावर नचिकेतचा चेहरा अगदी रडवेला झाला. भर बेलबाग चौकात कुणीतरी कानाखाली श्रीगणेश काढावा, अशी अवस्था झाली होती. मिथिलासुद्धा स्तब्ध होती. तर पप्प्या आणि प्रिन्सेस जल्लोष करीत होते. आशय आणि ऋतुजाचं अभिनंदन करीत होते. नचिकेत आणि मिथिलाचं स्तब्ध राहणं इतरांच्या लक्षात येण्याआधी, मिथिलानं त्या दोघांचं अभिनंदन केलं. त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नचिकेत काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. इतरांनी विचारल्यावर तब्येत बिघडल्याचा बहाणा त्यानं केला. लगेच बाईकला किक मारून तो चालता झाला. मिथिला त्याच्या लहान होत जाणाऱ्या आकृतीकडे एकटक बघत होती. कारण त्याचं दुःख फक्त तीच समजू शकत होती. फक्त तीच... मिथिला
(क्रमशः)

No comments: