Tuesday, November 16, 2010

तो आणि ती (भाग तीन)

प्रपोजला उत्तर प्रपोजने (तो आणि ती)
 
ग्रुपमधील सर्वांची "कॅम्पस इंटरव्हू'त निवड झाल्यावर अवघ्या काही दिवसात मिथिलानं नचिकेतला प्रपोज करण्याचं धाडस केलं. दोघांची आधीपासून निखळ मैत्री होती. दोघे एकमेकांना अभ्यासात मदत करीत होते. त्याच मैत्रीचं रूपांतर ओघाओघाने प्रेमात झालं. मिथिलाच्या निष्पाप, निर्मल प्रेमानं परिपक्वतेची पातळी ओलांडल्यावर तिला फार काळ मूग गिळून गप्प बसून राहणं शक्‍य नव्हतं. शेवटी ती व्यक्त झाली. पण अनपेक्षित प्रपोजनं नचिकेत प्रारंभी थोडा बावरलाच... चला बघुया जरा...
दोघेही कॅन्टीनमध्ये एकाच टेबलावर बसले होते. मिथिलाने प्रपोज केल्यावर दोघांमध्ये कमालीची रहस्यमय शांतता पसरली. मिथिला बोलत असताना तो तिच्या डोळ्यात बघत होता. तिला किमान मान डोलवून प्रतिसाद देत होता. पण आता त्याची नजर शून्यात लागली होती. त्याचे निःशब्द होणे, मिथिलाला मरणप्राय ज्वाळांनी भाजून काढत होते. शरीरातून भीतीची अनामिक लहर जात होती. सर्वांगाला कापरे फुटले होते. ती अपराधी भावनेने नचिकेतकडे बघत होती. आपल्या हातून काहीतरी मोठी चूक झाली असल्याची वारंवार जाणीव होत होती. त्याने तोंडातून अवाक्षरही न काढल्याने मिथिला पुन्हा बोलती झाली.
""अरे नचिकेत... मी तुला काहीतरी महत्त्वाचं विचारलंय... तुझ्याकडून मला उत्तर अपेक्षित आहे. मी काही चुकीचं बोलली असेल, तर मला माफ कर... पण असं कोड्यात टाकू नकोस. तुझं असं निःशब्द होणं, मला ठायी ठायी मरणप्राय वेदनांनी रक्तबंबाळ करीत आहे. प्लीज! काहीतरी बोल... नाहीतर आगीतून फुफाट्यात अशीच माझी अवस्था होईल,'' मिथिलाने मनातील वेदना बोलून दाखवल्या.

पण तरीही नचिकेतची तंद्री भंगली नाही. त्याचा अगदी पुतळा झाला होता. जणूकाही तो तिथे नव्हताच.
"हे बघ नचिकेत... (तो मिथिलाकडे बघतो) जर तुला वेळ हवा असेल, तर विचार करून निर्णय घे... मलाही घाईत घेतलेला निर्णय नकोय... आणि जर तुझा नकार असेल, तर मला स्पष्ट बोललेलं आवडेल. जे काही असेल, ते पाण्यासारखं स्पष्ट असायला हवं... उगाच दोघांच्याही मनात शंकांना जागा नको... तुला पटतंय ना मी काय बोलतेय ते...???'' मिथिला जिद्दिला पेटली होती.

मिथिलेच्या दबावाने नचिकेतच्या मनावर मणामणाचं दडपण आलं. बोलण्यासाठी म्हणून तो थोडा खाकरला. आणि म्हणाला,""मिथिला आपण डिप्लोमापासून खूप खूप छान मित्र आहेत. आपण कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपविली नाही. ग्रुपमधल्या इतरांच्या चुगल्या करतो, सिक्रेट्‌स शेअर करतो, एवढा आपला एकमेकांवर अतूट विश्‍वास. माझी तर तू अगदी जिवाभावाची मैत्रीण आहेस. मी तुला सगळं सांगतो. पण तुझ्या अशा अनपेक्षित प्रपोजनं मला कोड्यात टाकलंय... माझ्या मनात असं काहीतरी आहे, की जे मी तुलाच सांगू शकतो. पण आता सांगणं अवघड जातंय...!''

"अरे काय हे नचिकेत... हीच का दोस्ती... माझ्यापासून पण आता तू काही गोष्टी लपवायला लागला आहेस! बस का यार... मी आता तुला एवढी परकी झाली आहे का...? माझ्याशिवाय तुझं पानही हालत नाही. आणि आता म्हणे मला सांगू की नाही, तेच कळत नाहीये,'' अगदी दुःखाचा घोट गिळून मिथिला बोलत होती. त्याचं आपल्यावर प्रेम नाही किंवा तो कशाला तरी घाबरत आहे, अशी दाट शंका मनात शिरली होती. त्याची केवळ मैत्री होती, प्रेम नव्हे... असं तिचं अंतर्मन सारखं बजावत होतं. पण तरीही मनाला कडक करून ती बोलत होती. आणि काहीच समजलं नाही, असा खोटा भाव चेहऱ्यावर आणत होती.

"मिथिला माझं ऋतूजावर प्रेम आहे. प्रेम म्हणजे मला ती मनापासून आवडते. तसं मी याबाबत तिच्याशी कधी स्पष्ट बोललेलो नाही. कारण माझी हिंमतच होत नाहीये... पण ही गोष्ट फार काळ दडवूनही ठेवू शकणार नाही. ती समोर असली की सारखं तिच्याकडे बघत राहावं असं वाटतं... ती बोलत असली की सारखं ऐकत राहावं असं वाटतं...'' हिरोशिमा आणि नागासाकीवर अणूबॉम्ब पडावेत तसे नचिकेतचे शब्द मिथिलाच्या कानावर आदळत होते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. बोलक्‍या डोळ्यांमध्ये टचकन पाणी आलं. ओठ थरथरायला लागले. कंठ दाटून आला. डोळ्यातून डोकावणारे अश्रूंचे प्रवाह गालांवरून वाहताना वाट शोधू लागले. गळ्याभोवती गुंडाळलेली ओढणी ओली झाली. मनातली शंका खरी ठरल्यावर माणसाचा जरा पुतळा होतो, तशीच तिची अवस्था झाली होती. बोलकी मिथिला अबोल झाली, तर अबोल डोळे बोलायला लागले. अश्रूंच्या वाटेनं भावना व्यक्त करायला लागते. ओठांवर येणारे हुंदके तिने मोठ्या ताकतीने अडवून ठेवले होते. भावनांना कधीही पाझर फुटेल, असे वाटत असतानाही, नियंत्रण ढळू दिले नव्हते. तिने मोठ्या हिंमतीने डोळ्यांच्या कडांना रुमाल लावला. वाहत्या अश्रूंना अक्षरशः खरडून काढले.

"मिथिला सॉरी... पण तूच म्हटली होतीस की सांग म्हणून... मला माहीत होते, तुला फार दुःख होईल. म्हणूनच मी इतका वेळ गप्प होतो. प्लीज मला समजून घे... मी वाईट नाहीये. तुला माहीत आहे. माझ्या मनात आहे, तेच मी सांगतोय,'' नचिकेतने आपली बाजू स्पष्ट केली.
"इट्‌स ओके... असू दे... माझंच चुकलं. त्याची मला शिक्षा मिळाली... जाऊ दे... आणि मला फार काही दुःख-बिःख झालेलं नाहीये. असंच डोळ्यात पाणी आलं. तुला माहीत आहे, मी कधीही रडायला लागते ते... ते जाऊदे... तू ऋतूजाला कधी प्रपोज करणार आहेस, ते तरी सांग आधी...?''

दुःखाच्या महासागरात आकंठ बुडालेली मिथिला मैत्रीला जागली. तिने मैत्रीतील मैत्र नष्ट होऊ दिलं नाही. उलट आपलं पराकोटीचं दुःख लपवून ती त्याला मदत करण्यासाठी पुढे सरसावली.

"अगं... प्रपोज कसं करावं... तेच कळत नाहीये... तिने जर नाही म्हटलं, तर... हाच कडवट विचार मनात येतो. आणि सगळी एकवटलेली हिंमत क्षणात चक्काचूर होते. तू सांग ना... विषयाला कशी सुरवात करू ते... मला मदत कर ना...'' नचिकेत अजूनही मदतीची अपेक्षा करीत होता.

नचिकेतला काहीतरी फुटकळ उपाय सुचवून मिथिला थेट घरी आली. तब्येत बरी नसल्याचा बहाणा तिने केला होता. घरी येऊन ती बिछ्यान्यावर जवळजवळ कोसळलीच. तोंड उशीत लपवून धरलं. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आता हुंदके आवरणं शक्‍य होत नव्हतं. दुःखाची अगदी ढगफुटी झाली होती. या ढगफुटीत तिची कोवळी स्वप्न गवताच्या वाळलेल्या पातीप्रमाणे वाहून गेली होती. सर्वत्र अंधार भासत होता. आज तिला केवळ नकार मिळाला नव्हता, तर आपल्या प्रियकराला त्याच्या प्रेयसीचा होकार मिळवून देण्यासाठी त्याची मदत करायची होती. मैत्रीतलं मैत्र जपायचं होतं. तिनं शब्दच दिला होता तसा. असं करणं फार कठीण आहे, हे उमगत असलं, तरी मागे फिरणं काही शक्‍य नव्हतं. ती आज अगदी एका अनोळखी वळणावर उभी होती. बदललेला मार्ग दिसत असला, तरी त्यावर चालत जाणं म्हणजे लालेलाल निखाऱ्यांवर प्रीतीच्या पाकळ्या अंथरण्यासारखंच होतं... आपल्या प्रियकरासाठी... त्याच्या प्रेयसीसाठी... स्वतःला जाळून... कारण त्याच्या आनंदातच तिचा आनंद दडलेला होता... कारण तिचं प्रेम स्वार्थी नव्हतं...
(क्रमशः)

No comments: