Tuesday, November 16, 2010

तो आणि ती (भाग दहा)

कॉलेजमधलं प्रेमप्रकरण (तो आणि ती)
 
कॉलेज कॅम्पसमध्ये घसघशीत पगाराची नोकरी लागली. कंपनीचं प्रशिक्षण सुरू झालं. प्रशिक्षण कितीही कंटाळवाणं असलं, तरी त्याकडे तितकंच लक्ष देणं गरजेचं होतं. कारण त्यात नोकरी गमावण्याची जोखीम होतीच. पण तरीही नचिकेत-मिथिला आणि आशय-ऋतुजा यांचं फोनवर बोलणं काही कमी झालं नव्हतं. दररोज रात्री ठरावीक वेळी ते फोनवर येत असत. कॉलेजमध्ये प्रेमात पडल्यावर नचिकेतमधला कवी कधीच जागा झाला होता. कुशाग्र प्रतिभेवर हळव्या प्रेमाची फुंकर पडल्यावर शब्दरूपी भावना आपोआप साकारायला लागल्या. त्यानं अशीच एक कविता मिथिलाला ऐकविली. ती तुमच्यासाठी....
कॉलेजच्या पहिल्या दिवशी
तो गप्पा छाटत बसला होता
येत्या-जात्या मुलींना निरखत
मित्रांऐवढाच खोडकर होता

एवढ्यात त्याची शोधक नजर
पार्किंगच्या गेटवर स्थिरावली
मधाळ, मोहक स्मितहास्यात,
भीरभीरत्या डोळ्यांत हरवली.

"लव्ह ऍट फस्ट साइट'
असाच काहीसा तो भास होता
त्याचा तो राहिला नाही
मनासह उंच उंच उडत गेला

ओळख करून घेण्यासाठी
त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली
तिच्या मैत्रिणींशी हाय-बाय करीत
तोकड्या ग्रुपमध्ये जागा मिळवली

पुस्तकांची देवाण-घेवाण आणि
कॅन्टीन वाऱ्या झाल्या सुरू
तिला बघण्यातच दिवस जाई
वर्गातही साक्षात्कार झाले सुरू

एक दिवस त्याने गुलाब आणला
ठेवला तिच्या नाजूक तळहातावर
"आय लव्ह यू लॉट' म्हणत
नजर ठेवली थरथरत्या ओठांवर

तोंडातून अवाक्षरही न काढता
ती रुमालाशी चाळा करीत राहिली
विचार करून सांगते, म्हणत
गोड गोड रहस्यमय हसत राहिली

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच
दोघे भेटले पुन्हा कॅन्टीनमध्ये
धडधडत्या अंतःकरणाने
मन मोकळे केले डोळ्यांमध्ये

तिने आयुष्यभराची साथ मागितली
हातात नाजूक, गार हात देऊन
त्यानेही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या
समर्पणाला विश्‍वासाचे बळ रेलून

चार दिवसात खडकवासला, पानशेत
आणि सहाव्या दिवशी मल्टिप्लेक्‍स
महिन्याभरात अवाढव्य पुण्याचे
सगळे कोपरे अपरिचीतपणे दुमडले

प्रेमाच्या सुखद सोनेरी वाटचालीत
त्यांच्या ग्रुपमध्ये आली एक प्रिंसेस
सौंदर्य आणि पैशांच्या बळावर
उच्छाद मांडला पुरता नॉन्सेन्स

दोघांची निष्पाप, निर्मळ मनं
काही क्षणांसाठी झाली दूषित
शब्दाने शब्द वाढवला गेला
नात्यातली दरी वाढली डोळे पुशीत

शेवटी दोघांनाही पुन्हा आली
कॅन्टीनची कडकडून आठवण
वन-बाय टू वाफाळत्या कॉफीवर
उलगडली मनातली कडवट साठवण

त्याने तिला लगेच "आय एम सॉरी' म्हटले
"इट्‌स ओके', तिची रुसलेली कळी खुलली
तिचा हात हातात घेऊन त्याने हळूच दाबला
असं कधीच होणार नाही, वचनातून वदला
.

No comments: