Tuesday, November 16, 2010

तो आणि ती (भाग दोन )

पहिला प्रपोज मिथिलाचा (तो आणि ती)
 
कॉलेज कॅम्पसमध्ये निवड झाल्यावर टारगट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या ग्रुपचा उधाणता उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. सर्व विद्यार्थ्यांची कॅम्पसमध्ये निवड होणारा तो एकमेव ग्रुप होता. त्यामुळे लेक्‍चरर्सच्या डोळ्यांतील कौतुक आणि इतर विद्यार्थ्यांचा आदरभाव सहज लक्षात येण्यासारखा होता. तर काही रायव्हल ग्रुप्सचा जळतुकडेपणा भावी आयुष्यात उत्तुंग भरारी घेण्यासाठी उद्विग्न करीत होता. पण मिथिलाच्या मनात काही तरी वेगळंच सुरू होतं... बघू या जरा...
कॉलेज कॅम्पसमध्ये निवड झाली. आणि त्यांच्या ग्रुपचं नशीब फळफळून आलं. त्यांच्या जगात लक्षणीय असे सकारात्मक बदल होत गेले. वर्गातील सगळे विद्यार्थी पराकोटीच्या अदबीनं वागू लागले. काही जण, तर मदत करण्यासाठी कायम तत्पर राहायला लागले. वर्गमित्रांच्या स्वभावात झालेला हा टोकाचा बदल खरंच सुखावणारा होता. एवढंच नव्हे, तर कॉलेजचे लेक्‍चरर्ससुद्धा वर्गात त्यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करीत असत. तसं बघितलं तर वर्गातील इतरही काही विद्यार्थ्यांची कोणत्या ना कोणत्या कंपनीत निवड झाली होती; पण त्यांचा अख्खाच्या अख्खा ग्रुप सिलेक्‍ट झाल्यानं वर्गमित्र आणि लेक्‍चरर्सचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पुरता बदलला होता. कॉलेजच्या इतिहासात प्रथमच एक संपूर्ण ग्रुपची कॅम्पसमध्ये निवड झाली होती. याचा त्यांनाही बाणेदार अभिमान होता.

आता भरपूर अभ्यास करून फायनलमध्ये चांगली टक्केवारी मिळवायची होती. त्यासाठी आतापासूनच अभ्यासाची मोर्चेबांधणी सुरू झाली होती. आणि विशेष म्हणजे पप्प्या आणि मिथिलावर त्यांचं विशेष लक्ष होतं. ते इंग्रजीत थोडे कच्चे असल्यानं त्या दोघांशी इंग्रजीत बोलण्याचा जणू अलिखित नियमच करण्यात आला होता. याव्यतिरिक्त एकमेकांची उजळणी करून घेण्यापासून अभ्यासाच्या वेळापत्रकाचं नियोजन करण्यापर्यंत मजल मारण्यात आली होती. अभ्यासाचं महत्त्व पटल्यानं अगदी अभ्यास एके अभ्यास अशाच काहीशा वातावरणाचा ग्रुपमध्ये शिरकाव झाला होता. पण मिथिलाच्या मनात काही वेगळंच खूळ होतं. ती अगदी कुठंतरी हरवल्यासारखी वागत होती. तिचं आजकाल कशातच लक्ष नसे. डोळ्यांसमोर पुस्तक असलं, तरी मन मात्र कुठंतरी दूर दूर भटकत असे. ग्रुपमध्ये वावरताना ती कायम नचिकेतकडे चोरून बघायची. त्याच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करायची. त्याला याचं काही अप्रुप नव्हतं; पण ग्रुपच्या इतरांना हे कोडं अधिक गडद होत असल्याचं लक्षात यायला लागलं होतं.

""खरंच कॅम्पसमध्ये निवड होण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आतापर्यंत घेतलेल्या शिक्षणाचं चीज झालं, असं वाटतं. निवड झाल्याबरोबर हातात पैसा आला नसला, तरी पॅकेजचा उल्लेख केल्यावर पदरात मोठं यश पडल्याचा भास होतो. प्रत्येक महिन्याला हातात किती पैसे येतील, याचे ढोबळमानानं अंदाज लावले जातात. खरंच पैशानं यश मोजता येतं का...? नाही, कधीच नाही... पण करिअर करण्यासाठी... गलेलठ्ठ पगारासाठी केलेली शैक्षणिक धडपड यशस्वी झालेली असते, हे मात्र खरंय... खरंच...!'' सायंकाळी घराच्या गच्चीवर फिरताना मिथिला विचार करीत होती-

एक मात्र छान झालं. आमच्या ग्रुपमधील सर्वांची कॅम्पसमध्ये निवड झाली. आणि तेही एकाच कंपनीत. म्हणजेच आमचा ग्रुप एकसंध राहिला. अगदी डिप्लोमापासून आम्ही एकत्र आहोत. डिप्लोमा. त्यानंतर इंजिनिअरिंग. कित्ती कित्ती एन्जॉय केलं नाही... गॅदरिंग, ट्रिप, सेमिनार, स्पोर्टस इव्हेन्ट्‌स. आमचा आगदी जल्लोष होता. खूप दंगामस्ती केली. आणि अजूनही करतोय. पण अभ्यासाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. नियमित अभ्यास करायचा म्हणजे करायचा. शिवाय आपल्याप्रमाणेच ग्रुपच्या इतरांनाही तो करायला लावायचा, असा आमचा शिरस्ता. त्याची मधुर फलनिष्पत्ती झाली.' मिथिला एकदा विचारचक्रात अडकली की तिला कशाचंच भान राहत नसे.

"पण मला अशक्‍यप्राय भासत असलेलं यश मिळविण्यासाठी नचिकेतची खूप खूप मदत झाली. त्यानं डिप्लोमापासून अभ्यासाला हातभार लावला. कधी नोट्‌ससाठी नाही म्हटलं नाही. कायम मला "अभ्यास करीत जा... अभ्यास करीत जा...!' असा बजावायचा. प्रारंभी मला त्याचं बोलणं फार उर्मट, उद्धट वाटायचं. एवढा काय अभ्यासासाठी आग्रह करायचा, असं मनात यायचं. पण त्यात त्याची काळजीवजा चिंता लपलेली होती. प्रारंभी मला ती पटली नाही. पण नंतर समजल्यावर मन अगदी पिसासारखं हलकं झालं. एखादा व्यक्ती आपली काळजी घेतो म्हटल्यावर खरंच सुख म्हणजे काय ते कळतं. शिवाय त्या व्यक्तीच्या अपेक्षांवर आपला कस लागण्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो... मला खरंच तो मनापासून आवडतो. तो दिसायला सुंदर नसला, रंगानं थोडा गव्हाळ असला, तरी त्याचा स्वभाव मला भावतो. खरंच... आय लव्ह यू नचिकेत... आय लव्ह यू लॉट...' मिथिलाच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं. बुडणाऱ्या सूर्याकडे डोळे लागले असले, तरी नजर शून्यात होती. आज पहिल्यांदीच मनातील भाव चेहऱ्यावर उतरला होता.
""मिथिलेऽऽऽ ए मिथिलेऽऽऽ किती वेळ गच्चीवर फिरतेस... अंधार पडायला आला. घरी ये खाली...'' आईचा आवाज कानावर आदळल्यावर झोपेत तोंडावर पाणी मारल्यावर एखादा माणूस जागा होतो, तशीच मिथिला दिवास्वप्नातून जागी झाली.

ती घरी आली असली, तरी मनात विचारांनी पिंगा घातला होता. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. एखाद्या व्यक्तीला प्रपोज करण्याच्या परिपक्वतेपर्यंत आपलं प्रेम आल्याचा भास होत होता. मनातला प्रेमभाव उगाच हळुवारपणे छळायला लागला होता. आतून आंतरिक साद येत होती. गेल्या काही दिवसांपासून हा भाव ग्रुपपासून लपवून ठेवणं कठीण जाऊ लागलं होतं. कळत नकळत तो व्यक्त होऊ पाहत होता. हीच योग्य वेळ आहे, असं अबोल मनाचं बोलकं अनुमोदन मिळत होतं. तिनं धडधडणाऱ्या हृदयाला थोडं सावध केलं. मन जरा घट्ट केलं आणि उद्याच नचिकेतला प्रपोज करण्याचा धाडसी निर्णय रात्री बिछान्याला पाठ टेकवताना घेऊन टाकला.

दुसरा दिवस उजाडला. कॉलेज भरलं. नियमित लेक्‍चर सुरू झालं; पण मिथिलासमोर फक्त प्रपोजचा विचार होता. ती योग्य संधीची वाट बघत होती. प्रपोजसाठी दबा धरून बसलेल्या मनाला लाडीक लाडीक समजावत होती. मधल्या सुटीत तिला आयतीच संधी चालून आली. नचिकेतला लायब्ररीतून काही पुस्तकं घ्यायची होती. तो एकटाच लायब्ररीत जाणार होता. तेव्हा मिथिलानंही लायब्ररीत काम असल्याची बतावणी केली. दोघं लायब्ररीत गेले; पण मिथिलाच्या तोंडातून अवाक्षरही बाहेर पडत नव्हतं. तिचा आत्मविश्‍वास डळमळीत होत होता. अशक्‍य अशी भीती मनात संचारली होती. भीतीची एक अनामिक लहर सर्वांगाला छेदून जात होता. प्रपोजला सुरवातच करता येत नव्हती. नचिकेतच्या प्रश्‍नांना "हो- नाही' अशी उत्तरं देऊन विषय संपवीत होती. शेवटी त्याचं पुस्तक घेऊन झालं आणि दोघं ग्रुपमध्ये परतलेसुद्धा. मिथिलाच्या मनातला विचार मनातच राहून गेला. चालून आलेल्या संधीची राखरांगोळी झाली.

घरी गेल्यावर तिला आपल्या भित्रेपणाचा खूप खूप संताप आला. चालून आलेली संधी हुकल्याचं फार वाईट वाटत होतं. मनात विषण्णता पसरली होती. उदासीनता डोकं वर काढीत होती. पण तिनं प्रपोजचा विचार मोडला नाही. उद्या पुन्हा प्रयत्न करण्याचा ज्वलंत निर्धार केला. कणाकणानं ढासळणाऱ्या मनाला प्रखर आत्मविश्‍वासाची जोड दिली.

दुसऱ्या दिवशी संधीची वाट न पाहता मिथिलानं नचिकेतला कॅन्टीनमध्ये बोलवलं. त्याच्याशीच काही खास काम असल्याचं सांगितलं असल्यानं त्यानं याची कुठेच वाच्यता केली नव्हती. दोघेही कॅन्टीच्या बाकांवर स्थिरावले. दोघांमध्ये काही काळ शांततेची मोकळी दरी पसरली.
""काय काम होते मिथिला...? काही महत्त्वाचं आहे का...?'' शेवटी नचिकेतनं वातावरणातील साठलेला तणाव मोकळा केला.
""नचिकेत तुला खरंच काही तरी महत्त्वाचं सांगायचं आहे. प्लीज त्याचा चुकीचा अर्थ लावू नकोस. मला माझं मन मोकळं करायचं आहे. मी गेल्या काही दिवसांपासून मनात घुसमटत आहे. आज मला सगळं स्पष्ट करायचं आहे. पण प्लीज तू मला समजून घेण्याचा प्रयत्न कर... आणि काहीही झालं तरी आपल्या मैत्रीवर त्याचा काही परिणाम होणार नाही, असं मला आधी वचन दे...!'' मिथिला बोलायला लागली.

""हो मी वचन देतो... काहीही झालं तरी आपली मैत्री कायम राहील... माझं वचन राहील...'' नचिकेतच्या शब्दांमध्ये विश्‍वास झळकत होता.
""माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तू खूप खूप आवडतोस. अगदी मनापासून. तू मला हवाहवासा वाटतो. तुझ्याशी सारखं बोलत राहावं, वेड्यासारखं बघत राहावं, असं वाटतं. आणि हो... हे फिजिकल अट्रॅक्‍शन मुळीच नाही. माझ्या निष्पाप, निर्मल प्रेमाला अशी दूषणं कदापि लावू नकोस. मी याबाबत फार सिरीअस आहे,'' मिथिला व्यक्त झाली.

नचिकेत शांतपणे ऐकत होता. दोघांमध्ये पुन्हा रहस्यमय शांततेची दरी पसरली. बोचरी.
(क्रमशः)

No comments: