Tuesday, November 16, 2010

तो आणि ती (भाग पाच)

प्रेम हे प्रेम असतं... (तो आणि ती)
 
नचिकेतकडून प्रपोजचं धाडस होत नव्हतं. मिथिलानं त्याचा तोकडा आत्मविश्‍वास वाढविला. त्याला प्रोत्साहित केलं. हीच खरी परीक्षेची वेळ आहे, हे मनापासून पटवून दिलं. पण प्रपोज करण्याआधीच नचिकेतच्या प्रेमाची राखरांगोळी झाली. नचिकेतला व्यक्त होण्याची साधी संधीही मिळाली नाही. आशयनं आधीच ऋतूजाला प्रपोज केलं होतं आणि तिनंही ते प्रेम हसतहसत स्वीकारलं होतं. या आकस्मिक घडामोडीनंतर नचिकेत भावनिक कोसळला. जीवनाच्या वाटचालीत अडखळला, पुरता रुतून पडला. त्याला भक्कम आधाराची गरज होती. हा आधार फक्त आणि फक्त मिथिलाच देऊ शकत होती. बघुया पुढे काय झालंय ते...
कॅम्पातली पार्टी संपल्यावर सगळे घरी पांगले. मिथिलाही घरी परतली. तिनं आपल्या स्वतंत्र खोलीतील अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तूंची आवरासावर सुरू केली. पण एक विचार अजूनही मनाला डिंकासारखा चिकटला होता. नचिकेत कसा असेल...! तो घरी तर नीट गेला असेल ना...! कदाचित त्याच्या खोलीत रडत बसला असेल...! किंवा उदास मनाने झोपी गेला असेल...! आशयनं ऋतूजाला प्रपोज केलं आणि तिनंही त्याचं प्रेम स्वीकारलं, हे कळाल्यावर त्याच्या चेहरा कसा कोमेजून गेला होता... फुलण्याआधीच तोडलेल्या गुलाबासारखा... त्याचं आभाळाएवढं व्यापलेलं दुःख समजत होतं. पण इतरांसमोर काही बोलणं, त्याला समजावणं समंजसपणाचं वाटलं नसतं.

"नचिकेतनं ऋतूजावर मनापासून प्रेम केलं. पण त्याला व्यक्त होता येत नव्हतं. कदाचित तो कधी व्यक्तही झाला नसता. मनातलं प्रेम मनातच राहिलं असतं. एकाअर्थी ते बरं झालं असतं. त्याच्या पदरी निराशा तर आली नसती. प्रेमाच्या स्वप्नरंजनात व्यत्यय तर आला नसता. पण मी त्याला प्रपोजसाठी तयार केलं. त्याची मनधरणी केली. त्याच्या मनात खोट्या अपेक्षा जागवल्या. मृगजळ दाखविलं. त्यानंही माझ्यावर असलेल्या विश्‍वासापायी पुढाकार घेतला. पण शेवटी व्हायचं तेच झालं... मला नचिकेतला दुखवायचं नव्हतं. माझा तसा मुळीच उद्देश नव्हता. माझंही त्याच्यावर प्रेम आहे. खरं प्रेम... किमान त्याला त्याचं प्रेम मिळावं हाच माझा सात्त्विक उद्देश होता. पण आमचा प्लॅन आमच्यावरच उलटला,'' कपड्यांच्या घड्या करताना मिथिला उदास दिसत होती. चेहरा भावहीन होता. मनाला सारखी नचिकेतची चिंता लागून राहिली होती.

मिथिलानं शेजारी टेबलावर पडलेला मोबाईल उचलला. तब्बल आठव्यांदा ती नचिकेतला फोन करीत होती. पण पलीकडून काही रिप्लाय मिळत नव्हता. प्रारंभी किमान रिंग तरी जात होती. आता तर त्यानं मोबाईल स्वीच ऑफ केला होता. फोन करणं निष्फळ होतं. तिनं नचिकेतला एसएमएस केला. उद्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये भेटायला ये, असं सांगितलं.

दुसऱ्या दिवशी कॉलेज सुरू होण्याआधीच दोघे कॅन्टीनमध्ये आले. नचिकेतचा चेहरा पुरता पडला होता. डोळे अगदी विस्तवासारखे लालभडक दिसत होते. डोक्‍याचे केस गवताच्या पात्यांप्रमाणे उभे होते, एकमेकांत गुंतून पडले होते. कपड्यांची दशा झाली होती. तो रात्रभर विचार करीत बसला होता, क्षणभरही झोपला नव्हता, हे त्याच्याकडे बघितल्याबरोबर मिथिलाला जाणवलं. तिनं वातावरणातील शांतता छेदण्यासाठी कॉफी ऑर्डर केली. तो काही न बोलता खाली मान घालून पुतळ्यासारखा ध्यानस्थ झाला होता. तिनंही काही क्षण पेशंस राखला. थोड्या वेळात वाफाळणारी कॉफी आली. दोघांनी कॉफी रिचवल्यावर मिथिला बोलती झाली.

"जाऊ दे रे नचिकेत... एवढा काय विचार करतोस. डोक्‍याला विचारांचं बेंड यायचं... विचार करून करून... जे व्हायचं होतं ते झालं... आता पुढचा विचार कर... पुन्हा एखादी छानशी मुलगी मिळेल. आणि आताच काय घाई झालीये प्रेमाची. आपण एन्गेज नसलेलेच बरं. एन्जॉय बॅचलर लाइफ यार... हाऊ थिंग्ज वर्क्‍स... उलट तू प्रपोज करण्याआधीच तुला खरी परिस्थिती कळाल्यानं किमान नामुष्की टळली ना रे मित्रा... असं काय करतोस...'' मिथिला समजवण्याच्या सुरात बोलत होती.

"तुला माझं दुःख कळणार नाही..., तुला नाकारलं जाणं म्हणजे काय हेच माहीत नाही... असंही म्हणता येत नाही. मीच तुला मनापासून दुखावलं आहे. तुझ्या भावनांचा, निःस्वार्थ प्रेमाचा जराही विचार न करता... तू माझं आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी स्वतः जळत राहिली. एखाद्या दिव्याप्रमाणं... माझं प्रेम मला मिळवून देण्यासाठी अपमानाचे कडवट घोट सोसत राहिली. आणि त्याची मला जराही जाणीव होऊ दिली नाहीस. तू माझी खरी मैत्रीण आहेस,'' नचिकेतला कंठ फुटला.
"अरे पण...''
"एक मिनीट मिथिला... मला आज बोलू दे... प्लीज... सॉरी यार... पण मला बोलायचंय... प्लीज... मिथिला माझ्या हट्टापायी मी माझं प्रेम गमवलंय. मी प्रपोज करायला विलंब केला, असं म्हणणं चुकीचं आहे. कारण ऋतूजाच्या मनात जर माझ्याविषयी प्रेम नसेल, तर मी आधी प्रपोज करूनही काही उपयोग नव्हता. तिचा तेव्हाही नकारच राहिला असता. असो... तो विषय संपला आता...'' एक अवंढा गिळून तो पुन्हा बोलायला लागला.

"मिथिला मी माझं प्रेम गमावलंय. कायमचं. आता मला माझी मैत्रीण गमवायची नाहीये... तू खूप छान आहेस. माझ्यावर मनापासून प्रेम करतेस. माझी काळजी घेतेस. मला कायम मदत करतेस. काय हवं नको, ते बघतेस. तू खरंच ग्रेट आहेस... मिथिला प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. पण मला आता तुझं प्रेमही हवंय... एका प्रेयसीच्या रूपानं माझ्या आयुष्यात प्रवेश कर... कधीही न संपणाऱ्या झऱ्याप्रमाणे असलेलं तुझं निष्पाप, निर्मळ प्रेम मला अनुभवू दे... माझं आयुष्य सुकर, सुखमय आणि सदाहरित कर... प्लीज मला समजून घे... प्लीज...'' नचिकेत आर्जव करीत होता.

पण त्याच्या बोलण्यानं मिथिला कोड्यात पडली. त्याला काय उत्तर द्यावं, तेच तिला समजत नव्हतं. त्याला नाकारल्याचं दुःख झालं असेल म्हणून समजवण्यासाठी तिनं त्याला कॅन्टीनमध्ये बोलविलं होतं. पण तो तर प्रपोजची भाषा करीत होता. एक मन म्हणत होतं की लागलीच त्याला "हो' म्हणावं. आपलं प्रेम आपल्यापर्यंत चालून आलंय. ते कसं काय सोडायचं. तर दुसरं मन गोंधळलेलं होतं. कारण मिथिला नचिकेतचं प्रेम नव्हती. कोणता निर्णय घ्यायचा तेच समजत नव्हतं. अगदी द्विधा मनःस्थिती झाली.

"हे बघ मिथिला... नाही म्हणू नकोस... आणि माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थही काढू नकोस... मी डॅम सिरिअस आहे... मी काल रात्रभर विचार करीत होतो. प्रेम गमावण्याचं दुःख काय असतं, ते मला काल समजलं. मला माहीत आहे, मी थोडी घाई करतोय. पण माझा नाइलाज आहे. प्लीज मला समजून घे... मी तुला गमवू शकत नाही... आपली मैत्री कायम टिकून राहील, मी तुझी आयुष्यभर मैत्रीण राहील वगैरे वगैरे सगळं समजतं मला... पण तू एखाद्या दुसऱ्या मुलाचं प्रेम स्वीकारलस, तर आपल्या मैत्रीला ग्रहण लागेल, हेही तेवढंच खरं आहे... त्यामुळे प्लीज अशी पळवाट काढू नकोस. मी पूर्ण विचार करून बोलतोय. माझं बोलणं अर्थहीन नाही...'' नचिकेत आपल्या विचारांवर ठाम होता.

"अरे नचिकेत... मला समजतं रे... पण आता चटकन "हो' म्हणावं, या परिस्थितीत नाही रे मी... तुझा नकार मी एक्‍सेप्ट केला. माझ्या पडझडणाऱ्या मनाला समजावलं. बजावलं. आता पुन्हा परतीची वाट पकडणं वाटतं तेवढं सोपं नाही रे... आणि मला ठाऊक आहे की तुझं माझ्यावर प्रेम नाही... केवळ एक चांगली मैत्रीण गमवायची भीती वाटत असल्यानं तू मला प्रेमासाठी पसंती दर्शवीत आहेस... अरे मित्रा ज्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम नाही, त्याला होकार देणं हे कितीसं योग्य आहे? पुढे भविष्यात मला तुझं मनापासून प्रेम मिळेल हे कशावरून तू गृहीत धरतोस... जिथे प्रेमाचा अंकुरच फुललेला नाही... तिथे जबरदस्तीनं कसं काय प्रेमाचं रोपटं तग धरेल... थोडा विचार कर माझा... माझ्या आयुष्याचा...'' मिथिलानं मनातली शंका बोलून दाखविली.

"मिथिला प्लीज हं... असं काहीवाही बोलू नकोस... अगं ओळख, मैत्री आणि प्रेम, हीच प्रेमाची क्रमवारी आहेना... मग सध्या आपली मैत्री आहे... हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमात होईल. तू विश्‍वास ठेव... तुझ्या मनात निष्कारण शंका उफाळत आहेत,'' नचिकेत हट्टाला पेटला होता. पण मिथिला काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तिनं विचार करण्यासाठी वेळ मागितला. कारण तिला घाईत निर्णय घ्यायचा नव्हता...
(क्रमशः)

No comments: