Tuesday, November 16, 2010

तो आणि ती (भाग आकर)

प्रेमातील खाच-खळगे (तो आणि ती)
 
मिथिला आणि नचिकेत. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. बाजू दोन असल्या, तरी तेवढेच एकरूप. एक जीनसी. मनानं! प्रारंभी दोघांची निखळ मैत्री. त्यानंतर प्रेम जडलं. "हो-नाही'ची अग्निपरीक्षा पार पडली. प्रेमाचा सुखकर प्रवास सुरू झाला. पण तरीही मैत्री कायम राहिली. अगदी आधी सारखीच. उलट मैत्रीला भावनिक कंगोरे प्राप्त झाले. एक हळवं नातं तयार झालं. ते दोघांनी जिवापाड जपलं. त्याला संजीवनी प्रदान केली. हे नातं दिवसागणिक अधिक मजबूत, समंजस होत गेलं. त्याचा दोघांनाही अभिमान होता. पण कालांतरानं गैरसमजाची खिंडारं पडायला लागली. त्यांचा व्यास वाढायला लागला. दोघांची भावनिक ओढाताण वाढली...
मल्टिनॅशनल कंपनीत प्रशिक्षण सुरू झालं. प्रशिक्षणस्थळ पुण्यातच असल्यानं दररोज घरी ये-जा करणं शक्‍य होतं. प्रारंभी काही दिवस प्रशिक्षणाची नवलाई टिकली. त्यानंतर त्याचंही रुटीन झालं. थोडा कंटाळा यायला लागला. पण तेवढंच सजग राहणं गरजेचं होतं. काही दिवसांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे स्वतंत्र गट तयार करण्यात आले. त्या गटांना कंपनीतील अनुभवी टीम-लिडर्स देण्यात आले. नचिकेत, ऋतूजा, प्रिन्सेस आणि पप्प्या एक गटात होते, तर मिथिला आणि आशयची निवड एक दुसऱ्या गटात झाली. प्रशिक्षण संपल्यावर प्रत्यक्ष काम करतानाही हे गट कायम राहणार होते. मिथालाच्या गटात स्थान मिळण्यासाठी नचिकेतनं त्यांच्या टीम-लीडरला विनंती-विनवण्या केल्या. पण काही फायदा झाला नाही. तयार केलेले गट मोडण्यास तो तयार नव्हता. शेवटी नाइलाजास्तव नचिकेतला आपल्याच गटात राहावं लागलं. त्याची धडपड व्यर्थ ठरली. ते वेगवेगळ्या गटात असले, तरी लंच-ब्रेक किंवा ऑफिस सुटल्यावर एकमेकांना भेटणं शक्‍य होतं.

प्रशिक्षण संपलं आणि प्रत्यक्ष कामाचा बोजा डोक्‍यावर येऊन पडला. आता आयुष्यात फक्त काम आणि कामच होतं. वैयक्तिक आयुष्याशी असलेली नाळ तुटायला लागली. सगळे कामात आकंठ बुडाले. आठवड्यातील काही दिवस तर तब्बल दहा-बारा तास काम करावं लागत होतं. कामात टार्गेट देण्यात आलं होतं. प्रत्येक गटानं ते अचिव्ह करणं सक्तीचं होतं. सबंध गटाला टार्गेट असलं, तरी त्या गटाचा सदस्य म्हणून प्रत्येकाला स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात आली होती. टीम-लिडर्सची कामात मदत होत होती. प्रसंगी वरिष्ठांकडून मार्गदर्शनही होत होतं. जीवनाला एक वेगळं वळण लागलं होतं. या अनोळखी वळणावर ते कधी रुजले आणि वैयक्तिक आयुष्यापासून भरकटले हे त्यांचं त्यांनाच समजलं नाही.

एकीकडे त्यांचं करिअर सुरू झालं असताना दुसरीकडे त्यांचे छंद, आवडी-निवडी मागे पडायला लागल्या. कॉलेजला असताना आशय आणि मिथिला छान ड्रॉइंग काढायचे. कॉंलेजमध्ये झालेल्या स्पर्धेत दोघांनी पारितोषिक पटकाविले होते. मिथिलाला निसर्गचित्र काढायला भारी आवडायचं. तिच्या खोलीत निसर्गचित्रांचा स्वतंत्र कप्पा होता. तर नचिकेतला कविता करायला आवडायची. कॉलेजच्या वार्षिक पुस्तकात त्याच्या कविता छापून आल्या होत्या. तेव्हापासून ग्रुपमधील इतर सगळे त्याला कविवर्य नचिकेत महाराज म्हणून चिडवायचे. आणि तो चिडायचाही! प्रिन्सेसला जुनी नाणी आणि इतर देशांमधील चलन जमा करण्याचा छंद होता. तिच्याजवळ अगदी शिवाजी महाराजांच्या काळातलं नाणंही होतं. तिनं ते जपून ठेवलं होतं. तिच्या आजोबांनी ते नाणं तिला वाढदिवसाला गिफ्ट म्हणून दिलं होतं. वास्तविक तिच्या आजोबांनाही नाणी जमविण्याचा छंद होता. तो छंद अनुवाशिंकपणे म्हणा किंवा संस्कारांमधून तिला जडला. ऑफिस सुरू झाल्यावर त्यांना छंद जोपासणं अवघड जाऊ लागलं. तरीही वेळात वेळ काढून ते आपले छंद जपत होते.

नचिकेत मिथिलाच्या घरापासून राहायला दूर होता. तर मिथिला आणि आशयची घरं एकाच परिसरात होती. त्यामुळे मिथिला आणि आशय ऑफिसच्या एकाच कॅबमधून ये-जा करीत. गेल्या काही दिवसांमध्ये दोघांचं बोलणं बरंच वाढलं होतं. दोघंही सोबत ये-जा करीत असल्यानं त्यांना बोलायला निवांत वेळ मिळायचा. आणि ते ऑफिसमध्येही एकाच गटात होते. त्यामुळे मिथिलाच्या आणि आशयच्या बोलण्यात एकमेकांचा उल्लेख वाढत होता. नचिकेतला हे कुठेतरी खटकायला लागलं होतं. मिथिलाच्या बोलण्यात आशयचं नाव आलं की तो जरा वेळ स्तब्ध व्हायचा. पण त्यानं तसं कधी बोलून दाखविलं नाही. उलट थोडं असह्य झालं की तो विषय बदलायचा. वेगळ्या विषयावर चर्चा घडवून आणायचा. मिथिलाच्या हे लक्षात आलं नव्हतं. कदाचित प्रेमातील सुखकर प्रवासामुळे ती याबाबत तेवढी सजग नसावी. काही गोष्टी तिनं सहज गृहीत धरल्या असाव्यात. पण यामुळे नचिकेतच्या मनातील लचबिचलता दिवसागणिक वाढत होती. तो मनातल्या मनात धुमसत होता.

गेल्या रविवारी आशयचा मिथिलाला सकाळी फोन आला. विकेंड असल्यानं मिथिला निवांत होती.
""मिथिला... माझ्या बाबांनी काल मुंबईहून काही निसर्गचित्रं आणली आहेत. तू ती चित्रं बघशील तर वेडीच होशील. ती डिजिटल प्रिंटिंगची असली, तरी अगदी हुबेहूब खरी दिसतात. आज फक्त आई घरी आहे. माझा लहान भाऊ पिंटू बाबांसोबत बाहेर गेलाय. तो सायंकाळपर्यंत काही येणार नाही. तू माझ्या घरी येणार असशील, तर ये... आपण दोघं मिळून ती चित्रं कॅन्व्हॉसवर उतरवता येतात का ते बघू...,'' आशयनं प्रस्ताव मांडला.

निसर्गचित्र म्हटल्यावर मिथिला अगदी उडत आशयच्या घरी गेली. त्यांनी आशयच्या खोलीत पेंटीगचं बस्तान मांडलं. आज त्याचा लहान भाऊ नसल्यानं त्यांना डिस्टर्ब करणारं तसं कुणी नव्हतं. आणि घरी आशयची आई असल्यानं वेळोवेळी चहा-कॉफी येत होती. मिथिला चित्र काढण्यात अगदी गुंग झाली. नचिकेतला फोन करायचं विसरली. यात कधी सायंकाळ झाली ते समजलं नाही. दोघांनी मिळून तब्बल तीन चित्रं काढली. समाधानानं ती घरी परतली.
तिनं सकाळीच आठवड्याभराचे कपडे भिजत घातले होते. ते तिला आधी धुवावे लागले. त्यात बराच वेळ गेला. त्यानंतर सहज मोबाईल बघितला. तर नचिकेतचे काही मिस्ड-कॉल्स होते. तिनं नचिकतेला फोन लावला. तो काहीसा चिडला होता. मिथिलानं फोन रिसिव्ह न केल्यामागचं कारण उघडं केलं. त्यावर नचिकेत जाम संतापला.

""मिथिला... किमान मला सांगून तरी जायचं ना... मी तुला फोन करीत होतो. आणि त्या आशयच्या घरी असलं कसलं महत्त्वाचं काम होतं...! म्हणे आम्ही ड्रॉइंग काढीत होतो. अख्खा दिवस तू त्याच्या घरी होतीस. तुला साधा एक मिनीटही वेळ कसा मिळाला नाही. एक फोन करायला फक्त एक मिनीट लागतो. एसएमएस तरी टाकायचा. काही सेकंद लागले असते. तुमच्या ड्रॉइंगमध्ये माझा फार व्यत्यय आला नसता...! पण तू तेही केलं नाहीस. तुझ्याकडून हे अपेक्षित नाही,'' नचिकेत रागावून बोलत होता. मिथिला शांत होती. त्याला काय उत्तर द्यावं, हे तिला समजत नव्हतं.
(क्रमशः)

No comments: